पणजी : पुढारी वृत्तसेवा
अपघातात जखमी झालेल्या केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांच्या प्रकृतीत तिसर्या दिवशी आणखी सुधारणा झाल्याची माहिती गोमेकॉच्या वैद्यकीय अधिकार्यांनी दिली. नाईक यांचा कृत्रिम श्वासोश्वास बंद केला आहे. त्यांच्यावर विशेष कक्षात उपचार सुरू आहेत.
अंकोला (कर्नाटक) येथे मंंगळवारी झालेल्या अपघातात श्री. नाईक जखमी झाले आहेत. दिल्ली येथून एम्स रुग्णालयातील डॉक्टरांच्या पथकाने नाईक यांच्यावर उपचार करणार्या गोमेकॉच्या डॉक्टरांकडून उपचाराची माहिती घेतली. एम्सच्या पथकासोबत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंतसुद्धा उपस्थित होते. नाईक यांच्या प्रकृतीत सुधारणा पाहता त्यांना दिल्ली येथे हलविण्याची गरज नसल्याचे एम्सच्या पथकाचे म्हणणे आहे. आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी बुधवारी नाईक यांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस
केली.
एम्सच्या डॉक्टरांनी नाईक यांची प्रकृती तपासल्यानंतर त्यांनी गोमेकॉतील डॉक्टरांना काही सूचना केल्या. त्यांच्या प्रकृतीत झपाट्याने सुधारणा होत असून ते लवकरच पूर्णपणे बरे होतील, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले.
विजया नाईक यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार
श्रीपाद नाईक यांचा पत्नी विजया यांच्या पार्थिवावर गुरुवारी (दि. 14) आडपई - फोंडा येथे अंतिम संस्कार करण्यात येतील. सकाळी 8 ते 9 दरम्यान अंतिम दर्शनासाठी त्यांचे पार्थिव सापेंद्र - रायबंदर येथे ठेवण्यात येईल. त्यानंतर त्यांचे पार्थिव त्यांच्या मूळ गावी आडपई येथे नेण्यात येईल. सकाळी 9.30 ते 12 पर्यंत लोकांना येथे अंतिम दर्शन मिळेल. त्यानंतर अंत्ययात्रा त्यांच्या आडपई येथील निवासास्थानाहून स्मशानभूमीकडे निघेल.