Mon, Sep 21, 2020 04:49होमपेज › Goa › नळाच्या गळतीकडे पालिकेचे दुर्लक्ष

नळाच्या गळतीकडे पालिकेचे दुर्लक्ष

Published On: Apr 13 2018 1:14AM | Last Updated: Apr 13 2018 1:14AMमडगाव : प्रतिनिधी 

मडगाव नगरपालिका तसेच इतर बिगर सरकारी संघटनांकडून पाणी वाचविण्यासाठी अनेक उपक्रम राबविले जात आहेत. पाण्याच्या वाढत्या टंचाईविषयी लोकांना माहिती देऊन पाणी वाचविण्यास दरवर्षी ठिकठिकाणी जागृती करण्यात येते. मात्र मडगाव शहराच्या मध्यभागी कोमुनिदाद इमारतीजवळ  असलेल्या पालिकेच्या नळ जोडणीमधून गेल्या चार महिन्यांपासून गळती लागली असून अव्याहतपणे पाणी वाहून वाया जात आहे.  पाणी वाया जात असल्याची कल्पना असून याची कुणीच दखल घेतली नसल्यामुळे हजारो लिटर पाणी वाया गेले आहे.  

पाण्याचा एक एक थेंब महत्त्वाचा आहे पाणी वाचवा जीवन वाचवा या सूत्रावर अनेक जागृती उपक्रम राबविले जात आहेत. मार्च महिन्यात आठवडा भर पाणी वाचवावर अनेक उपक्रम राबविण्यात आले. असे असूनही मडगाव पालिकेच्या पाणी जोडणीतून गेल्या चार महिन्यांपासून पाणी  वाहत आहे. शहरात दर दिवशी शेकडो लोक नगरपालिकेत तसेच कोमुनिदाद इमारतीत येतात. ज्याठिकाणी या वाहत्या नळाची जोडणी आहे त्या फुटपाथवर अनेक विक्रेते बस्तान मांडून सामानाची विक्री करतात. परंतु वाया जाणार्‍या पाण्याकडे कोणी लक्ष देत नाही.

नगरपालिकेच्या या पाणी जोडणीचा नळ सतत उघड्यावर पडलेला असून अनेकजण त्याचा वापर करतात. नगरपालिकेचे अनेक कामगार त्या परिसरातील झाडांना पाणी घालण्यास, कधी फूटपाथ धुण्यास तर काही कामगार जेवणाची भांडी धुण्यासाठीसुद्धा याच नळाचा वापर करतात. त्याशिवाय इतर लोक आपल्याला हवे त्यावेळी या नळाचा वापर करतात परंतु नळाला गळती लागल्याबाबत कोणी आवाज करत नाहीत.सार्वजनिक बांधकाम खात्याचे कनिष्ठ अभियंता  भट यांना  प्रतिनिधीने  विचारले असता त्यांनी ताबडतोब या वाहत्या पाण्याच्या नळाची चौकशी केली. त्यावरून समजले की अजूनही पालिकेने या वाहत्या पाण्याविषयी कोणतीच तक्रार सार्वजनिक बांधकाम खात्याकडे केली नव्हती. विनाकारण पाणी गेल्या चार पाच महिन्यापासून वाहत असल्याने त्याठिकाणी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या प्लम्बरला पाठवून   भट यांनी   कारण शोधण्यास सांगितले.श्री. भट  म्हणाले, की   पाण्याचा गैरवापर करू नये किंवा ते वाया जावू देऊ नये. सार्वजनिक बांधकाम खात्याने एकदा जोडणी दिल्यावर त्याची देखभाल त्या नळाच्या मालकाने करायची असते. दुरुस्ती करायची असल्यास सदर मालकाने विभागाकडे याची तक्रार द्यावी.

पालिकेचा हा नळ उघड्यावर असल्याने या नळाचा वापर अनेकांकडून होत असतो. नळ सतत चालू बंद करून तर झाडांना पाणी घालण्यास  त्याला मोठं मोठे पाईप जोडून त्याचा नेहमीच विविध प्रकारे वापर केला गेल्याने नळाचे वॉशर गेला आहे.  सध्या याची दुरुस्ती  प्लम्बरने केली आहे, अशी  माहिती भट यांनी दिली. याकडे पालिकेने लक्ष न दिल्यास   पुन्हा समस्या उद्भवणार आहे. नळाच्या देखभालीची जबाबदारी पालिकेने घ्यावी. नळ उघडा टाकून चालणार नाही.  शक्य असल्यास नळ कायमस्वरूपी बंद करावा. कारण  पाणी विनाकारण वाया घालवणे हा सर्वांत मोठा गुन्हा असल्याचे अभियंता भट यांनी सांगितले.

Tags :Ignorance ' tap leakage o, corporation ,goa news