Sat, Aug 15, 2020 13:27होमपेज › Goa › केंद्रात काँग्रेस सरकार आल्यास राज्यातही सत्ता

केंद्रात काँग्रेस सरकार आल्यास राज्यातही सत्ता

Published On: Apr 20 2019 1:52AM | Last Updated: Apr 20 2019 12:51AM
डिचोली : प्रतिनिधी

देशाची व  गोव्याची  स्थिती सध्या भाजपने अत्यंत बिकट केली असून सर्वच व्यवसायांवर गदा आणून जनतेचे कंबरडेच मोडले आहे. यावेळी काँग्रेस पक्षाच्या यशात प्रत्येकाने आपल्या  बहुमूल्य वाटा उचलणे गरजेचे आहे.    देशात काँग्रेसचे सरकार  सत्तेत  येणार असून  राहुल गांधी पंतप्रधान बनणार आहेत. केंद्रात काँग्रेस सरकार स्थापन होताच गोव्यातही   काँग्रेस सरकार स्थापन होईल, असा विश्वास आमदार तथा माजी मुख्यमंत्री रवी नाईक यांनी व्यक्त केला.

वाठादेव सर्वण येथे झालेल्या काँग्रेसच्या सभेत रवी नाईक बोलत होते.  व्यासपीठावर काँग्रेसचे उत्तर गोवा उमेदवार गिरीश चोडणकर, आमदार प्रतापसिंह राणे, मयेच्या प्रभारी सुनिता वेरेकर, माजी आमदार धर्मा चोडणकर, विजय पै, अ‍ॅड. यतीश नाईक, आनंद नाईक, जमीर मागोडकर, अमरनाथ पणजीकर, कार्लुस आल्वारीस  होते.

नाईक म्हणाले,भाजपने आतापर्यंत केवळ फसवी आश्वासने देऊन लोकांना आपल्या बाजूने खेचले  आहे. मात्र आज जनता सुज्ञ बनली  असून फसव्या आश्वासनांना भीक  घालणार नाही. आम्हाला  गुलामगिरीत रहायचे आहे का, या देशाचे भवितव्य सुरक्षित हातात देऊन सुखाने जगायचे आहे, याचा विचार लोकांनी करायला हवा. पाच वर्षे केंद्रात सरकार असतानाही खाणी सुरू करण्यात हे भाजपवाले अपयशी ठरले,आणि आता पुन्हा केंद्रात सत्ता आल्यावर खाणी सुरू करण्याची  आश्वासने देत आहेत.  

माजी मुख्यमंत्री तथा आमदार प्रतापसिंह राणे यांनी सांगितले,की गोव्यात गेली सात वर्षे सत्तेवर असलेल्या भाजपने खाणी बंद पाडून काय साध्य केले? सामान्य तसेच अशिक्षित बेरोजगार युवकांना, लोकांसाठी अर्थार्जनाचे मोठे साधन असलेल्या खनिज खाणी बंद पाडून भाजपने गरीब लोकांच्या पोटावर पाय ठेवला आहे. त्यांना आता आणखी  यापुढे सत्तेवर राहण्याचा कोणताच हक्क नसून त्यांना घरी पाठविण्यासाठी काँग्रेसला  संधी द्या. तसेच आज या भाजप सरकारमुळे उदभवलेल्या समस्यांविषयी त्यांना जाब विचारा, असे आवाहनही त्यांनी केले.

उत्तर गोवा मतदारसंघाचे उमेदवार  गिरीश चोडणकर म्हणाले,की निवडून येताच गोव्यातील बंद खाणींचा आवाज दिल्लीत उठवणार आणि खाणी सुरू करण्यासाठी प्रयत्न करणार. खाण कामगारांना सुरक्षा देण्याचे आमचे धोरण असून भूमिपूत्रांवर होणार अन्याय आता सहन केला जाणार नाही. गोव्यात तीन खासदार असून त्यांना साधी पंतप्रधानांच्या भेटीसाठी  वेळ  न  मिळणे, ही दुर्दैवी बाब आहे.  भाजप सरकारने सामान्य लोकांशी निगडित   सर्वच व्यवसाय ,धंद्यावर अंकुश लावला  असून लोकांना कंगाल बनवून त्यांचे कंबरडेच मोडले आहे, असेही ते  म्हणाले.
धर्मा चोडणकर, सुनीता वेरेकर0, कार्लुस आल्वारीस, ट्रोजन डिमेलो आदींनीही आपले विचार मांडले. सूत्रसंचालन अमरनाथ पणजीकर यांनी केले.