Mon, Sep 21, 2020 04:38होमपेज › Goa › काँग्रेस सत्तेत आल्यास मोठ्या रोजगार संधी : गिरीश चोडणकर 

काँग्रेस सत्तेत आल्यास मोठ्या रोजगार संधी : गिरीश चोडणकर 

Published On: Apr 13 2019 1:54AM | Last Updated: Apr 13 2019 1:47AM
पणजी : प्रतिनिधी

काँग्रेसचे सरकार सत्तेत आल्यास राज्यात स्वयंरोजगार करू पाहणार्‍या युवकांना व्यवसायासाठी पहिली तीन वर्षे कोणतीही  मान्यता अथवा परवाना  घेण्याची गरज राहणार नाही. याशिवाय  कोकणी राजभाषा अवगत असलेल्या स्थानिक युवकांसाठी  रोजगार  संधी उपलब्ध करणार असल्याचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष तथा लोकसभेचे उमेदवार गिरीश चोडणकर यांनी आश्‍वासन दिले. 

येथील काँग्रेस भवनात घेतलेल्या पत्रकार परिषदेत चोडणकर बोलत होते. ते  म्हणाले की, राज्यात स्वत:चा व्यवसाय अथवा कारखाना ‘स्टार्टअप’ करणार्‍या युवकांचा   वेळ आणि श्रम शासकीय परवाने आणि मान्यता घेण्यातच वाया  जाते, त्यामुळे त्यांचे नुकसान होते.  भाजप सरकारच्या जीएसटी, नोटाबंदी यामुळे  देशातील सर्व  व्यवसायांमध्ये मंदी आली आहे. मात्र, यामुळे मोठ्या प्रमाणावर युवक स्वंयरोजगाराकडे वळणार असून नोकर्‍या मागणारेच अन्य युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करतील.

राज्यात सुशिक्षित युवकांना  रोजगार उपलब्ध होत नसल्याने युवक तसेच त्यांचे पालक चिंतेत असतात. यावर उपाय म्हणून काँग्रेसला सत्ता मिळाल्यास तत्कालीन राष्ट्रपतींनी 1960 साली राजभाषेला प्रोत्साहन देण्यासाठी जारी केलेल्या आदेशाचे सर्व राज्यात पालन केले जाईल. त्यातून मोठ्या प्रमाणात स्थानिक  युवकांना रोजगार मिळेल. या आदेशानुसार, केंद्र सरकारच्या  सर्व राज्यातील कार्यालयात हिंदी अथवा स्थानिक राजभाषेचा  दैनंदिन कामकाजात वापर करणे अनिवार्य आहे. यामुळे गोव्यात शाखा असलेल्या विमानतळ प्राधिकरण, कोकण रेल्वे, भविष्य निर्वाह निधी, पुराभिलेख आदी सुमारे 42 केंद्रीय खात्यांमध्ये कोकणी राजभाषा अवगत असणार्‍या गोमंतकीय युवकांना नव्या रोजगार  संधी उपलब्ध होणार आहेत.

याशिवाय जीवन बिमा निगम, अन्न महामंडळ, ओएनजीसी, मुरगाव पतन न्यास आदी 12 केंद्रीय संस्था तसेच 674 राष्ट्रीय बँकांच्या स्थानिक शाखांमध्ये कोकणी जाणणार्‍या युवकांना नोकर्‍या प्राप्त होणार आहेत. केंद्राच्या सर्व स्थानिक कार्यालयांतील अर्ज अथवा माहिती कोकणीतून मिळणेही आवश्यक करण्यात आले असून या कायद्याचे अजून गांभीर्याने पालन केले जात नव्हते. काँग्रेस देशात सत्तेवर आल्यावर गोव्यात राष्ट्रपतींच्या या आदेशाचे काटेकोरपणे पालन करून   रोजगार संधी उपलब्ध केल्या जाणार आहेत. तसेच, राहुल गांधी यांनी घोषित केलेल्या काँग्रेसच्या जाहीरनाम्यात देशभरात 32 लाख रोजगार आणि 10 लाख ‘पंचायतमित्र’ ही पदे स्थापन केली जाणार  असून त्याचा गोमंतकीयांनाही फायदा मिळणार असल्याचे चोडणकर यांनी सांगितले. 

भाजपचे केंद्रीय नेते नितीन गडकरी यांनीच ‘गद्दारांना धडा शिकवा’ अशी हाक भाजप कार्यकर्त्यांना दिली आहे. आमदार म्हणून निवडून देऊनही शिरोडा मतदारसंघातील लोकांचा सुभाष शिरोडकर यांनी अपमान केला आहे. मात्र, शिरोड्यात महादेव नाईक यांनी मतदारांशी गद्दारी केली नसून ते मागील निवडणूक हरले होते. मतदारांनी दिलेल्या कौलाचा अपमान करून पक्षबदल करणार्‍या फुटीर आमदारांना घरी बसवण्याची तयारी जनतेने केली असून भाजप कार्यकर्तेगडकरींचा सल्ला ऐकणार आहेत, असा टोमणाही चोडणकर यांनी हाणला. 

पणजी पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसचा उमेदवार निश्‍चितीसाठी पणजी गटसमिती तसेच प्रदेश निवडणूक समितीची लवकरच बैठक घेतली जाणार आहे. उत्पल पर्रीकर हे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचा राजकीय वारस असल्याचे आपल्याला वाटत नाही. जे भाजप ‘फॅमिली राज’ला विरोध करत होते तेच आता पणजी आणि म्हापशात आमदारांच्या मुलांना तिकीट कसे देऊ शकतात, असा सवालही चोडणकर यांनी उपस्थित केला. 

गोमंतकीयांची भावना ‘मगो’ने ओळखली : चोडणकर

गेली दोन वर्षे लोकशाही मूल्यांची थट्टा करून अनैतिक राजकारण करणार्‍या भाजपला धडा शिकवण्याचे गोमंतकीय जनतेने निश्‍चित केले आहे. लोकसभेच्या दोन जागा  आणि विधानसभेच्या चार पोटनिवडणुकांत मिळून भाजपाचा 6 विरुद्ध 0  असा पराभव करणे हेच काँग्रेसचे ‘लक्ष्य’ आहे. गोमंतकीयांच्या भावना समजून आणि लोकांची नस ओळखून ‘मगो’ने लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या दोन्ही उमेदवारांना पाठिंबा दिला आहे, असे सांगून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष तथा उत्तर गोव्याचे उमेदवार गिरीश चोडणकर यांनी मगो कार्यकारिणीचे अभिनंदन केले.