Tue, Aug 04, 2020 11:35होमपेज › Goa › कोरोनाविरोधी लढ्यात राज्य सरकारला संरक्षण दलांकडून मदत

कोरोनाविरोधी लढ्यात राज्य सरकारला संरक्षण दलांकडून मदत

Last Updated: Jul 11 2020 1:23AM
पणजी : पुढारी वृत्तसेवा

कोरोनाविरोधी लढ्यात राज्य सरकारला मदतीचा हात देण्यासाठी गोव्यातील तटरक्षक दल,  नौदल, लष्कर  व  हवाई दलाच्या  यंत्रणा आणि  मनुष्यबळ सज्ज ठेवण्यात येणार आहे. यासंबंधी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याशी संरक्षण दलातील वरिष्ठ अधिकार्‍यांनी शुक्रवारी चर्चा करून आराखडा निश्‍चित केल्याची माहिती केंद्रीय आयुष (स्वतंत्र प्रभार) व संरक्षण राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी पाटो येथे घेतलेल्या  बैठकीनंतर दिली. 

केंद्रीय मंत्री नाईक म्हणाले, की या बैठकीत व्हाईस अ‍ॅडमिरल पी. फिलीपोस, ब्रिगेडियर संजय रावळ, तटरक्षक दलाचे उपमहानिरीक्षक हिमांशू नौटीयाल यांनी संरक्षण दलातर्फे एकत्रितरित्या कोरोनाच्या संकटाशी लढा देण्याबाबत रणनीती ठरविली आहे. राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून राज्य सरकारला कोरोनाविरोधात लढ्यात आवश्यक असलेली सर्व मदत आणि सहकार्य दिले जाणार आहे. राज्याला गरज पडल्यास संरक्षण दलाची इस्पितळे, डॉक्टर, परिचारिका, वैद्यकीय उपकरणे उपलब्ध करून दिली  जाणार आहेत.

मुख्यमंत्री सावंत यांनी  कोरोनाविरुद्ध प्रतिकारक शक्‍ती वाढविणार्‍या  औषधांचे राज्यातील चाळीस मतदारसंघात वाटप करण्यास स्थानिक आमदारांना सांगितले आहे. ही औषधे केंद्रीय आयुष मंत्रालयातर्फे वितरित केली जाणार असून शुक्रवारी आणखी औषधाचा पुरवठा दिल्लीहून केला आहे. राज्यातील सुमारे 6 लाख लोकांना आमदारांतर्फे या  औषधांचे वाटप केले जाणार असल्याचे नाईक यांनी सांगितले.