Mon, Nov 30, 2020 12:26होमपेज › Goa › ‘त्या’ दहा काँग्रेस आमदारांविरोधी अपात्रता याचिकेवर सुनावणी

‘त्या’ दहा काँग्रेस आमदारांविरोधी अपात्रता याचिकेवर सुनावणी

Last Updated: Oct 16 2019 1:12AM
पणजी : प्रतिनिधी

काँग्रेस पक्षातील 10 आमदारांनी भाजपमध्ये केलेल्या पक्षांतराविरूद्ध काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी दाखल केलेल्या अपात्रता याचिकेवर मंगळवारी (दि.15) सभापती राजेश पाटणेकर यांनी सुनावणी घेतली. याचिकादाराच्या वतीने दाखल करण्यात आलेल्या जबानीची नोंद करून घेतली असून 10 आमदारांना नोटीस पाठवायची की नाही यावर लवकरच निर्णय घेतला जाणार आहे, असे सभापती राजेश पाटणेकर यांनी सांगितले. 

यंदाच्या जून महिन्यात काँगेे्रसच्या पंधरा आमदारांपैकी दोन-तृतीयांश, म्हणजे दहा आमदारांना एकाचवेळी भाजपमध्ये प्रवेश देण्यात आला होता. यात विद्यमान उपसभापती तथा काणकोणचे आमदार इजिदोर फर्नांडिस, उपमुख्यमंत्री तथा केपेचे आमदार चंद्रकांत कवळेकर, जलस्रोत मंत्री तथा वेळ्ळीचे आमदार फिलीप नेरी रॉड्रिग्स, महसूलमंत्री तथा ताळगावच्या आमदार जेनिफर मोन्सेरात, पणजीचे बाबूश मोन्सेरात, कुंकळ्ळीचे क्लाफासिओ डायस, नुवेचे विल्फे्रड डिसा, थिवीचे निळकंठ हळर्णकर, सांत आंद्रेचे फ्रान्सिस सिल्वेरा आणि सांताक्रुजचे टोनी फर्नांडिस या आमदारांचा समावेश होता. या दहा आमदारांना अपात्र ठरवावे, अशी मागणी करून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी अपात्रता याचिका दाखल केली होती. 

सभापती पाटणेकर यांच्यासमोर याचिकादाराचे वकील अभिजित गोसावी यांनी भारतीय घटनेच्या 10व्या परिशिष्टाच्या कलम-2 नुसार त्या आमदारांनी स्वत:हून आमदारकीचा आणि काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला असल्याचे नमूद केले. ज्या पक्षाच्या उमेदवारीवर विधानसभा निवडणूक लढवली आणि आमदारकी मिळवली, त्याचा राजीनामा देऊन अन्य पक्षात केलेला प्रवेश म्हणजे पक्षाचे दोन-तृतीयांश विलिनीकरण होत नाही, असा मुद्दा मांडून गोसावी यांनी सर्वोच्च न्यायालयातील काही निवाडेही सादर केले. 

सभापती पाटणेकर यांनी यावेळी आमदारांविरूद्ध अपात्रता याचिका विधानसभेत निवडून आलेला सदस्यच मांडू शकतो, असा मुद्दा मांडला. त्यावर लोकशाहीत कुठलीही सामान्य व्यक्ती आमदारांविरूद्ध अपात्रता याचिका दाखल करू शकत असल्याची कागदपत्रे उदाहरणासह याचिकादारांच्या वतीने सादर करण्यात आली. याचिकादारांच्या वतीने मांडलेल्या मुद्द्यांचा आपण अभ्यास करून सुनावणीची पुढील तारीख कळवू, असे सभापतींनी सांगितले.