Mon, Sep 21, 2020 05:44होमपेज › Goa › सरकारी कार्यालये तूर्तास बंदच

सरकारी कार्यालये तूर्तास बंदच

Last Updated: Apr 14 2020 10:56PM
पणजी : पुढारी वृत्तसेवा 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभर ‘लॉकडाऊन’ची मुदत 3 मेपर्यंत वाढवल्याने राज्यातही त्याचे काटेकोरपणे पालन केले जाणार आहे. त्यामुळे, राज्यातील सरकारी कार्यालये बुधवारपासून (15 एप्रिल) सुरू करण्याचा घेतलेला निर्णय येत्या 20 एप्रिलपर्यंत पुढे ढकलण्यात आला आहे. सरकारी कर्मचार्‍यांसाठी बुधवारपासून खास ‘कदंब’ बसेसची सेवा सुरू करण्याचा निर्णयही स्थगित ठेवण्यात आला असून त्यावर 20 एप्रिल रोजीच पुढील निर्णय घेतला जाणार आहे. मात्र, लोकांना गरज असल्याने राज्यातील गोमेकॉ वगळता, अन्य काही जिल्हा आणि खासगी इस्पितळातील ‘बाह्यरुग्ण विभाग’ (ओपीडी) खुले ठेवण्याचा निर्णय कायम राहणार आहे, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आल्तिनो येथील शासकीय बंगल्यावर मंगळवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत  सांगितले. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी सकाळी देशाला उद्देशून  केलेल्या भाषणानंतर मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दुपारी पत्रकार परिषद घेऊन सांगितले,की  की मोदी यांनी येत्या 3मेपर्यंत ‘लॉकडाऊन’ची मुदत वाढवली असल्याने राज्यातही लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी केली जाणार आहे. सरकारी कर्मचारी, शिक्षण संचालनालयाच्या तसेच  अन्य सरकारी खात्यांच्या कर्मचार्‍यांसाठी बुधवारपासून नियमीत कामावर येण्यासाठी राज्य सरकारने जारी केलेले परिपत्रक मागे घेण्यात आले आहे. सरकारी कर्मचार्‍यांना ये-जा करण्यासाठी 206 खास कदंब बसेसची व्यवस्था करण्याचा निर्णयही 20 एप्रिलपर्यंत स्थगित ठेवण्यात आला आहे. पुढील निर्णय आता 20 एप्रिलनंतरच घेतला जाणार आहे. आजारी लोकांना अडचण होऊ नये म्हणून राज्यातील काही खासगी आणि जिल्हा इस्पितळातील ‘ओपीडी’  विभाग सुरू ठेवण्यात आले असून डॉक्टर व अन्य आरोग्य कर्मचार्‍यांसाठी आवश्यक असलेले मास्क, व्हेंटिलेटर्स, औषधांचा साठा उपलब्ध ठेवण्यात आला आहे.       

 केंद्र सरकारची मार्गदर्शक तत्वे बुधवारी, 15 एप्रिल रोजी   जाहीर करण्यात येणार असून त्यानंतर लगेच कोणते व्यवसाय अथवा उपक्रम सुरू ठेवावेत, हे राज्य सरकार निश्‍चित करणार आहे. दहावीच्या विद्यार्थ्यांनी आपला अभ्यास सुरू ठेवावा व शिक्षकांनी त्यांना कायम संपर्कात राहून मार्गदर्शन करावे. राज्यात कोरोनासंदर्भात आरोग्य सर्वेक्षणाचे काम दुसर्‍या दिवशीही चांगले सुरू असून  त्यात कोठेही अडथळा आलेला नाही. लोकांनी आतापर्यंत चांगले सहकार्य दिले असून ते सर्वेक्षण पूर्ण करेपर्यंत कायम ठेवावे, असे आवाहन यावेळी मुख्यमंत्र्यांनी केले.     

राज्य सरकारकडून    आधीच्या लॉकडाऊनच्या काळात स्वंयसेवकांना तसेच कंपनीतील लोकांना अथवा वैयक्तीकरीत्या प्रवास करण्यासाठी देण्यात आलेले पासेस व परवानग्या यांची मुदत  14 एप्रिलपर्यंत  होती. ती  आता 3 मेपर्यंत वाढवण्यात आली असून त्यासाठी पुन्हा जिल्हाधिकार्‍यांकडे मान्यता घेण्याची आवश्यकता नाही. राज्य सरकारतर्फे राज्यातील गरजूंना देण्यात येत असलेल्या  सामाजिक कल्याण  योजनांचा लाभ बंद केला जाणार नसून या लॉकडाऊनच्या काळात अनेकांना या निधीचाच आधार असणार आहे. राज्यात सध्या पर्यटन बंद असले तरी परिस्थिती सुधारल्यानंतर राज्यात पर्यटन पुन्हा जोमाने सुरू होईल, असा  विश्‍वास  मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला . 

प्रवेश नाक्यावर तपासणी सक्तीची

राज्याच्या सर्व सीमांवरील आठही प्रवेश नाक्याच्या ठिकाणी परराज्यातील कोणालाही तपासणीशिवाय सोडले जाणार नाही. सर्व नाक्यांच्या ठिकाणी ‘सॅनिटायझर टनेल’ उभारण्यासाठी आरोग्य खात्याला सांगण्यात आले आहे. मालवाहू ट्रकांच्या  चालक आणि एकाच वाहकाला राज्यात प्रवेश दिला जाणार असून  या टनेलमधून निर्जंतुकीकरणाचा फवारा घेतल्यानंतरच त्यांना आत घेतले जाणार आहे. मात्र,ट्रकातील परराज्यातील लोकांना  राज्यात वास्तव्य करण्यास परवानगी दिली जाणार नसून आपला माल दुकानांना अथवा आस्थापनांना पोचवल्यानंतर त्यांनी पुन्हा राज्याबाहेर जाणे गरजेचे आहे. हे ट्रक राज्यात प्रवेश करून परत कधी व कोठून बाहेर पडतात, याचे ‘ट्रेकिंग’ ठेवण्यासाठी वाहतूक आणि पोलिसांना यंत्रणा तयार करण्यास सांगण्यात आले आहे. 

 "