Mon, Sep 21, 2020 05:58होमपेज › Goa › गोमेकॉ कँटीन्स बंद; रुग्ण नातेवाईकांचे हाल

गोमेकॉ कँटीन्स बंद; रुग्ण नातेवाईकांचे हाल

Published On: Apr 13 2018 1:14AM | Last Updated: Apr 13 2018 1:34AMपणजी : प्रतिनिधी

बांबोळी येथील गोमेकॉतील तीन कँटीन्स एफडीएच्या बंदी आदेशानुसार बंद करण्यात आल्यामुळे रुग्णांचे, नातेवाईकांचे तसेच डॉक्टर- परिचारकांचे हाल होत  आहेत.  गोमेकॉ आवाराबाहेरील  गाडेवाल्यांनी मात्र या बाबीचा  लाभ घेऊन  वाढीव दराने खाद्यपदार्थांची विक्री सुरू केली असून रुग्णांच्या त्रासात आणखी भर पडली आहे. गोमेकॉच्या प्रवेशद्वारावरच या गाडेधारकांनी अतिक्रमण करून अस्वच्छ भागात चक्क खानावळी सुरू केल्या असून त्याकडे अन्न व औषध प्रशासनाकडून होत असलेल्या  दुर्लक्षाबद्दल  आश्‍चर्य व्यक्त होत आहे. 

अन्न व औषध प्रशासनाने सोमवारी गोमेकॉतील बाह्य रुग्ण विभागातील, महाविद्यालयीन कँटीन्स  आणि तळमजल्यावरील कँटीन्सवर धडक कारवाई करून तिन्ही कँटीन्स बंद पाडले. गोमेकॉ  आणि शेजारील दंतमहाविद्यालय  संकुलात  एकूण सात कँटीन्स   असून त्यापैकी  तीन कँटीन्स बंद झाली आहेत. गोमेकॉतील सुमारे 1200 रुग्णांना व त्यांच्या सेवेसाठी हजर असलेल्या नातलगांना कँटीन्स सेवा स्थगित झाल्यामुळे त्रास सोसावा लागत असल्याचे दिसून येत आहे. 
गोमेकॉ परिसरात नेहमी रुग्ण, नातेवाईक, डॉक्टर, परिचारिका, कर्मचारी, अधिकारीवर्ग मिळून सुमारे सात ते आठ हजार लोकांची वर्दळ  असते. या लोकांना नियमीत नाष्टा, चहा-पाणी, जेवण, शीतपेयांची गरज असल्याने कँटीन्सचालकांचा चांगला   व्यवसाय होत असे. मात्र, राज्य अन्न प्रशासनाने अचानक केलेल्या कारवाईमुळे गोमेकॉतील तीन कँटीनना टाळे ठोकण्याची वेळ त्यांच्या मालकांवर आली आहे.गोमेकॉ संकुलात  बाह्यरुग्ण विभागातील, महाविद्यालयीन तसेच तळमजल्यावरील अशी तीन कँटीन्स बंद असले तरी अन्य कँटीन्समध्ये हव्या त्या प्रमाणात खाद्यपदार्थांची उपलब्धता अथवा जेवणाची व्यवस्था नसल्याचे आढळून आले आहे. एफडीएच्या कारवाईचा अन्य कँटीन्सचालकांनीही   धसका घेतला असावा, असे काही रुग्णांकडून बोलले जात आहे. 

महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी काही स्वतंत्र कँटीन्स असून त्यात फक्त तयार पदार्थ आणि शीतपेये मिळतात. शेजारील मुलां- मुलींच्या वसतीगृहात स्वतंत्र कँटीन असून तेही कार्यरत होते. गार्ड हॉस्टेलचे, दंत महाविद्यालयाचे कँटीन सुरू असले तरी ते महामार्गापलिकडे असल्याने तिथे जाण्याबाबत  लोकांचा कल नसतो. गोमेकॉच्या मध्यवर्ती असलेले खुल्या गार्डनमध्ये असलेल्या कॅफेटेरियामध्ये  महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचीच गर्दी दिसून आली. या कॅफेटेरियामध्येही  चहा-कॉफी आणि शीतपेयेच उपलब्ध असून अधिकतर विद्यार्थी स्वतः घरून आणलेला डबा खातात. शिवाय येथील खुल्या जागेत गट करून  ‘टाईमपास’ करत असल्याचे आढळून आले. 

Tags :Gomez ,Contains, closed, condition , sick relatives