Mon, Sep 21, 2020 06:21होमपेज › Goa › पर्रीकर यांच्या स्वप्नातला गोवा साकारणार

पर्रीकर यांच्या स्वप्नातला गोवा साकारणार

Last Updated: Dec 15 2019 1:24AM
पणजी : प्रतिनिधी
माजी मुख्यमंत्री तथा देशाचे तत्कालीन संरक्षणमंत्री स्व. मनोहर पर्रीकर यांच्या प्रेरणेतून भविष्यात गोव्यात  संशोधक निर्माण व्हावा, या हेतूने  विज्ञान महोत्सव सुरू केला असून  महोत्सव राज्यात कायम सुरू ठेवला जाणार आहे. पर्रीकर यांचा स्वप्नातला सोनेरी गोमंतक घडविण्यासाठी आम्ही सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्नरत राहणार आहोत,  असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले. 

मिरामार येथे पर्रीकर यांच्या समाधीची पायाभरणी सावंत यांच्या हस्ते  शुक्रवारी करण्यात आली. त्या कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते. ते म्हणाले की, पर्रीकर यांनी समाजाच्या दुर्बल घटकांचा विचार करून लोककल्याणाच्या अनेक योजना साकारल्या. आम्हाला पर्रीकर यांचे विचार पुढे न्यायचे आहेत. पर्रीकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ  विज्ञान महोत्सव कायम आयोजित केला जाणार आहे. पर्रीकर यांनी स्पर्श करून आपला ठसा उमटवला नाही, असे एकही क्षेत्र नाही. राज्यात पुढच्या 50 वर्षांसाठी साधनसुविधांचा विकास व्हावा, या ध्यासाने पर्रीकर यांनी मोपा विमानतळ, महामार्गांचे जाळे, तिसरा  मांडवी पूल आदी कामे हाती घेतली. ती पाहताना पुढच्या पिढीला पर्रीकर नेहमी आठवत राहतील.

सावंत म्हणाले की, राज्याच्या विकासाचा दूरद‍ृष्टीने विचार करून पर्रीकरांनी  राजधानीत मांडवीवर तिसरा पूल उभारला त्यावेळी अनेकांनी त्यांच्यावर टीका केली होती. ही टीका आज चुकीची ठरली असल्याचे सिद्ध झाले असून पर्यटकांसाठी तो पूल आकर्षणाचे स्थळ बनले आहे. पाळी, सांगेसारख्या ग्रामीण आणि दुर्गम भागातही त्यांनी पूल उभे केले. पर्रीकर यांची आठवण सर्व गोमंतकीयांच्या मनात नेहमीच असून आपण मुख्यमंत्रिपदी असलो तरी त्यांची आठवण प्रत्येक दिवशी आजही काढत आहे. 

स्व. पर्रीकर यांच्या भव्य तैलचित्राला मुख्यमंत्री सावंत, वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो, जलस्रोत मंत्री फिलीप नेरी रॉड्रिग्स, सार्वजनिक बांधकाम मंत्री दीपक पाऊसकर,  पणजीचे आमदार बाबूश मोन्सेरात, आमदार दयानंद सोपटे, जोशुवा डिसोझा यांच्यासहीत भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पुष्पांजली वाहिली. या कार्यक्रमावेळी पर्रीकर यांचे दोन्ही पुत्र उत्पल व अभिजात, भाऊ अवधूत पर्रीकर उपस्थित होते. मिरामार येथे राज्याचे पहिले मुख्यमंत्री भाऊसाहेब बांदोडकर यांच्या समाधीजवळच सुमारे साडेसात कोटी रुपये खर्चून पर्रीकर यांची समाधी बांधली जाणार आहे.

 "