Sun, Sep 20, 2020 11:06होमपेज › Goa › मायनिंग पीपल्स फ्रंटच्या शिष्टमंडळाने घेतली राहुल गांधींची भेट 

मायनिंग पीपल्स फ्रंटच्या शिष्टमंडळाने घेतली राहुल गांधींची भेट 

Published On: Mar 09 2019 1:49PM | Last Updated: Mar 10 2019 2:02AM
पणजी :  प्रतिनिधी

गोवा मायनिंग पीपल्स फ्रंटच्या शिष्टमंडळाने काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची आज पणजीत भेट घेतली. यावेळी या शिष्‍टमंडळाने राहुल गांधी यांना दिल्‍लीतल्‍या भेटीत खाण व्यवसाय पुन्हा सूरु करण्याच्या आश्वासनाची आठवण करून दिली.

फ्रंटचे नेते पुती गावकर यांच्या अध्यक्षतेखाली ही भेट घेण्यात आली. यावेळी काँग्रेस अध्यक्ष गांधी यांनी सत्तेत आल्यास गोव्यातील खाणी पुन्हा सूरु करू या दिलेल्या आश्‍वासनाचा पुनरुच्चार केला.

फ्रंटचे नेते गावकर म्हणाले, की राज्यातील खाण व्यवसाय बंद होऊन एक वर्षाहून अधिक काळ लोटला आहे. सदर व्यवसाय सूरु होण्यासाठी दिल्‍ली पर्यंत आंदोलन करण्यात आले होते. याबाबत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची देखील दिल्‍लीत भेट घेण्यात आली होती. त्यावेळी त्यांनी हा व्यवसाय पुन्हा सूरु करण्यासाठी सहकार्य करण्याचे आश्‍वासन दिले होते असे त्यांनी सांगितले.

त्याचबरोबर खाण विषय हा न्यायप्रविष्ट असल्याने  न्यायालयात बाजू मांडण्यासाठी चांगला वकील  देण्याचेही त्यांनी आश्‍वासन दिले होते. त्यानुसार या आश्‍वासनांची आठवण त्यांना या भेटीत  करुन देण्यात आली. त्यानुसार गांधी यांनी सत्तेत आल्यास शाश्‍वत खाण व्यवसाय सूरु करण्यासाठी त्वरीत पावले उचलण्याचे आश्‍वासन दिल्याचे त्यांनी सांगितले.

खाण प्रश्‍नी नेत्यांकडून केवळ पोकळ आश्‍वासने दिली जात आहेत. जे आमच्या पोटावर पाय ठेवतील त्यांच्या विरोधात आगामी लोकसभा निवडणूकीत काम करण्याचा ठाम निर्णय गोवा मायनिंग पीपल्स फ्रंट तर्फे घेण्यात आला आहे. खाण अवलंबितांना असे आवाहनही देखील करण्यात आले आहे. जे आमचे काम करतील त्यांनाच आमचा पाठींबा असेल, असे गावकर यांनी  स्पष्ट केले.

गोव्यातील खाण व्यवसाय पुन्हा सूरु व्हावा यासाठी खाण कायद्यात दुरुस्ती करणे हा एकमेव पर्याय आहे. त्यामुळे सरकारने ही दुरुस्ती करुन गाव्यातील खाण व्यवसायाचा मार्ग मोकळा करावा अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.