Thu, Oct 01, 2020 02:22होमपेज › Goa › भाजपचे श्रीपाद नाईक पाचव्यांदा विजयी

भाजपचे श्रीपाद नाईक पाचव्यांदा विजयी

Published On: May 23 2019 3:15PM | Last Updated: May 24 2019 2:27AM
पणजी : प्रतिनिधी

गोव्यात झालेल्या लोकसभा निवडणुकीत उत्तर गोवा मतदारसंघात भाजपचे उमेदवार आणि केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांनी पाचव्यांदा विजय मिळवून हा मतदारसंघ सर्वाधिक वेळा जिंकण्याचा विक्रम नोंदवला. दक्षिण गोवा मतदारसंघात भाजपचे विद्यमान खासदार अ‍ॅड. नरेंद्र सावईकर यांना पराभव पत्करावा लागला. काँग्रेसचे फ्रान्सिस सार्दिन यांनी त्यांना 9751 मतांनी मात देऊन भाजपला 100 टक्के विजयाचे श्रेय मिळू दिले नाही.

उत्तर गोव्यात श्रीपाद नाईक यांनी 2 लाख 44 हजार 844 मते मिळवून निकटचे प्रतिस्पर्धी काँग्रेसचे उमेदवार गिरीश चोडणकर यांचा 80 हजार 247 मतांनी पराभव केला.चोडणकर यांना 1 लाख 64 हजार 597 मते प्राप्त झाली.

नाईक यांनी पहिल्या फेरीपासूनच चोडणकर यांना पिछाडीवर टाकण्यात यश मिळवले आहे. आल्तिनो येथील पॉलिटेक्निक कॉलेज संकुलात गुरुवारी सकाळी 8 वाजता उत्तर गोवा लोकसभा मतदारसंघाची मतमोजणीला सुरुवात झाली. पहिली फेरी सुमारे 10.20 वाजता संपली. या पहिल्या फेरीनंतर नाईक यांना 29, 998 मते, तर चोडणकर यांना 19,777 मते प्राप्त झाली. यामुळे नाईक यांना पहिल्या फेरीत 10,221 मतांची भक्कम आघाडी मिळाली ती त्यांनी प्रत्येक पुढील फेरीत वाढवत नेली. सकाळी 11.35 वाजता झालेल्या दुसर्‍या फेरीत नाईक यांना 57,702 तर चोडणकर यांना 40,967 मते मिळाली. या फेरीत चोडणकर 16,735 मतांनी मागे पडले होते. यानंतर तिसर्‍या फेरीचा 12.46 वाजता लागलेल्या निकालात नाईक यांना 83,556 तर चोडणकर यांना 62,002 मते प्राप्त झाली. यामुळे 21,554 मतांची आघाडी खासदार नाईक यांना मिळाली आहे. चौथ्या फेरीनंतर त्यांनी 28,804 मतांची आघाडी घेतली. त्यानंतर पाचव्या फेरीनंतरची ही आघाडी 32,628 वर पोहचली. पाचव्या फेरीत नाईक यांना 1,14,071 तर चोडणकर यांना 81,443 यांना मते मिळाली. नाईक यांची पाचव्या फेरीनंतरची आघाडी 32,628 वर पोहचली. 

सहाव्या फेरीनंतर नाईक यांना 1,19,780 तर चोडणकर यांना 84,297 मते मिळाली. यावेळी नाईक यांच्या आघाडीने 35,483 भक्कम आकार घेतला होता. सातव्या फेरीत नाईक यांची आघाडी 36,182 पर्यंत पोचली होती. रात्री उशीरा उत्तर गोवा लोकसभा मतदारसंघाचा निकाल जाहीर करण्यात आला.

टपालातून 1412 जणांनी बजावला हक्‍क

लोकसभा निवडणुकीची मुख्य मतमोजणी हाती घेण्याआधी 1412 टपाल मतदानाची मोजणी सकाळी 7 वाजता हातात घेण्यात आली. टपाल मतदानातही खासदार श्रीपाद नाईक यांनी सर्वाधिक 810 मते प्राप्त झाली. तर काँग्रेसचे उमेदवार गिरीश चोडणकर यांना 190 मते मिळाली. अन्य चार उमेदवारांना दोन आकडी संख्याही पार करण्यास अपयश मिळाले. टपालातून फक्‍त 16 जणांनी ‘नोटा’चा आधार घेतला असून 378 मते फेटाळण्यात आली असल्याची माहिती निर्वाचन अधिकार्‍यांनी दिली. 

नोटा ः 7063 मते

उत्तर गोव्यात भाजपा विरुद्ध काँग्रेस अशीच मुख्य लढत असून अन्य चार उमेदवारांनी मिळून 5 हजारांचा आकडा ओलांडला नाही. अमित कोरगावकर 2809, दत्ताराम पाडगावकर 4756, ऐश्‍वर्या साळगावकर 2127 , बबन कामत 3432 इतकी मते मिळवली, मात्र ‘नोटा’ च्या खात्यात 7063 मते आहेत.