Sun, Sep 20, 2020 09:56होमपेज › Goa › चोडणकर, कांदोळकर यांचा अर्ज दाखल

चोडणकर, कांदोळकर यांचा अर्ज दाखल

Published On: Apr 02 2019 1:56AM | Last Updated: Apr 02 2019 1:19AM
पणजी : प्रतिनिधी

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी सोमवारी लोकसभा निवडणुकीसाठी उत्तर गोवा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज उत्तर गोवा जिल्हाधिकारी आर. मेनका यांच्याकडे सादर केला. आपण लोकसभेत गोमंतकीयांचा आवाज बनणार, असे अर्ज दाखल केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना चोडणकर यांनी सांगितले.विरोधी पक्षनेते बाबू कवळेकर, ज्येष्ठ आमदार प्रतापसिंह राणे, नीळकंठ हळर्णकर, जेनिफर मोन्सेरात व अन्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.

चोडणकर म्हणाले, लोकसभा  निवडणूक प्रचारात केंद्र सरकारशी संबंधित तसेच राज्यातील जनतेला भेडसावणारे विविध विषय हाताळण्यात येतील. 2014 च्या लोकसभा निवडणूक प्रचारावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी  प्रचारावेळी गोव्याला विशेष दर्जा देणार, खाण व्यवसायाची समस्या सोडवणार, अशी आश्‍वासने दिली होती. मात्र, या आश्‍वासनांची पूर्तता अजूनही झालेली नसल्याची टीका त्यांनी केली.
विरोधी पक्षनेते बाबू कवळेकर म्हणाले, काँग्रेस हा धर्मनिरपेक्ष पक्ष आहे. लोकसभा निवडणुकीत उत्तर व दक्षिण गोव्यात काँग्रेसचा विजय निश्‍चित आहे. भाजपकडे सध्या निवडणुकीत कुठलेच मुद्दे नसून त्यांनी जनतेला दिलेली आश्‍वासनेदेखील पूर्ण केलेली नाहीत. 2012 च्या विधानसभा निवडणुकीत भाजप-मगो युतीला 23 जागा  मिळाल्या होत्या, तर 2017 च्या निवडणुकीत केवळ 13 जागांवर त्यांना समाधान मानावे लागल्याची टीका त्यांनी केली.

केंद्रातील भाजप सरकारदेखील पंतप्रधान मोदी यांच्या नावाने मते मागत आहेत. खाण व्यवसायाच्या विषयावर केंद्र तसेच राज्य सरकारला अपयश आले आहे. लोकसभा निवडणुकीत  काँग्रेसला जनतेकडून  कौल मिळणार, असे त्यांनी  सांगितले.

म्हापसा  : प्रतिनिधी

म्हापसा  मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत सुधीर कांदोळकर यांनी काँग्रेस पक्षातर्फे सोमवारी आपला उमेदवारी अर्ज निवडणूक अधिकार्‍यांकडे सादर केला. सुधीर कांदोळकरांच्या समर्थनार्थ    बाबू कवळेकर, प्रतापसिंह राणे, निळकंठ  हळर्णकर, जेनीफर मोन्सेरात, दिगंबर कामत, फ्रान्सिस सिल्वेरा, टोनी डिसा हे आमदार तसेच माजी केंद्रीय मंत्री अ‍ॅड. रमाकांत खलप, माजी नगराध्यक्ष अ‍ॅड. सुभाष नार्वेकर, नगरसेविका मधुमिता नार्वेकर, माजी नगरसेवक आनंद भाईडकर व  इतर पदाधिकारी  आणि सुधीर समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर  सुधीर कांदोळकर म्हणाले की, आमदार झाल्यास 265 दिवसांत म्हापसा बस स्थानक व रवींद्र भवनाचे काम हाती घेऊन म्हापसेकरांची इच्छा पूर्ण करणार. तार नदी सध्या उथळ झालेली आहे. नदीतून पाणी जलद गतीने वाहून जाईल, यासाठी प्रयत्न करणार आहे. म्हापशाच्या जनतेला हवा असलेला विकास नक्‍कीच करेन.

प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर म्हणाले की, गेली कित्येक वर्षे सुधीर कांदोळकर किंगमेकर होते. आता त्यांना किंग होण्याची संधी द्या. म्हापशात उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री होते; पण या शहराचा विकास त्यांच्याकडून झाला नाही. लोकांना म्हापसा शहराचा कायापालट झालेला हवा आहे. पैशांचा खेळ, आमदारांची तोडफोड हा तमाशा आता थांबवायला हवा. या निवडणुकीत दोनही खासदार काँगे्रसचे असतील, असा विश्‍वासही त्यांनी व्यक्‍त केला. माजी मुख्यमंत्री आमदार प्रतापसिंह राणे म्हणाले की, म्हापशात सध्या काँग्रेसचे वातावरण  आहे. विरोधी पक्षनेते बाबू कवळेकर म्हणाले की, कित्येक वर्षांनी म्हापशात काँगे्रसचा झेंडा फडकणार असा आम्हाला विश्‍वास आहे. म्हापशातील जनतेला परिवर्तन हवे आहे. ते मतांच्या वर्षावाने सिद्ध होईल.