Mon, Sep 21, 2020 05:06होमपेज › Goa › वाहिनीद्वारे 15 हजार घरांना गॅस पुरवठा

वाहिनीद्वारे 15 हजार घरांना गॅस पुरवठा

Last Updated: Jan 25 2020 12:06AM
पणजी : पुढारी वृत्तसेवा

राज्यातील 15 हजार घरांना पहिल्या टप्प्यात वाहिनीद्वारे गॅस पुरवठा करण्याचे काम 2022 सालापर्यंत पूर्ण होणार आहे. यात, दक्षिण गोव्यातील 6,098 आणि उत्तर गोव्यातील 9,588 घरांचा समावेश असल्याची माहिती राज्य वीज आणि उर्जामंत्री नीलेश काब्राल यांनी शुक्रवारी दिली. 

दिल्ली येथे केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यशाळेत गोव्यातर्फे काब्राल यांनी भाग घेतला होता. या कार्यशाळेत बोलताना काब्राल म्हणाले की, केंद्र सरकारच्या ‘शहरी गॅस वितरण नेटवर्क’ धोरणांतर्गत राज्य सरकारने प्रेरणा घेऊन गोव्यात वाहिनीद्वारे गॅस घरोघरी पोचवण्याचे काम हाती घेतले आहे. यासाठी केंद्र सरकारच्या मार्गदर्शक तत्वांचा अवलंब करताना आवश्यक वाहिनीचे जाळे व यंत्रणा उभारण्याचे काम सुरू झाले आहे. 

काब्राल म्हणाले की, राज्यात वाहिनीद्वारे गॅस पुरवठा करण्याचा पहिला टप्पा 2022 पर्यंत पूर्ण होणार आहे. या टप्प्यात राज्यातील शहरी भागात सुमारे 15 हजार घरांना गॅस पुरवठा करण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे. केंद्र सरकारच्या धोरणाखाली राज्य सरकारकडून गॅस वाहिनी घालणार्‍या खासगी कंपन्यांना आवश्यक ते सहकार्य दिले जात आहे. यासाठी राज्याचे मुख्य सचिव परिमल राय यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या समितीकडून सदर कामावर देखरेख ठेवली जाणार आहे. 

दक्षिण गोव्यात गॅस पुरवठा करण्यासाठी वाहिनी घालण्याचे काम ‘इंडियन ऑईल’ आणि ‘अदानी इंडिया प्रा. लि.’च्या संयुक्त विद्यमाने हाती घेण्यात आले आहे, असेही त्यांनी सांगितले.


 

 "