Thu, Oct 01, 2020 02:29होमपेज › Goa › रायबंदर हल्‍ला; चारही संशयितांना अटक

रायबंदर हल्‍ला; चारही संशयितांना अटक

Published On: Jul 10 2019 1:38AM | Last Updated: Jul 09 2019 11:45PM
पणजी : प्रतिनिधी

रायबंदर येथींल दोन गटांत झालेल्या खुनी हल्ल्याप्रकरणातील सर्व चारही संशयितांना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. यापैकी गौरीश बांदोडकर (वय 28, ताळगाव) याला पणजी पोलिसांनी तर जॅक ऑलिव्हेरा (30), कमलेश कुंडईकर (26) व मनीष हडफडकर (22) या तिन्ही संशयितांना जुने गोवे पोलिसांनी अटक केली आहे. 

त्याचबरोबर जुने गोवे पोलिसांनी यावेळी जॅक, कमलेश व मनीष या तिन्ही संशयितांनी या गुन्ह्यावेळी वापरलेली जीए07 वाय 8771 व जीए 07 व्ही 4756 ही वाहने जप्‍त केली आहेत. 
या हल्ल्यात वापरण्यात आलेला कोयता तसेच अन्य साहित्यही जप्‍त करण्यात पोलिसांना यश आले आहे.

या हल्ल्यानंतर सर्व संशयितांनी स्वत:चे मोबाईल फोन जाळून टाकले होते. पोलिसांनी या संशयितांविरोधात पुरावा नष्ट केल्याप्रकरणीही गुन्हा नोंद केला आहे. ताळगाव येथे एकनाथ जानू गावस यांच्यावर या चार संशयितांनी हल्‍ला केला होता. त्यानंतर गावस यांचे मित्र दिलीप काणकोणकर व कृष्णा कुट्टीकर (दोघे नागाळी, ताळगाव) हे हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी रायबंदरच्या दिशेने गेले. रायबंदर जंक्शन येथे त्यांनी हल्‍लेखोरांची दुचाकी पाहून हल्‍लेखोरांना त्यांनी जाब विचारला असता या हल्‍लेखोरांनी त्यांच्यावर हल्‍ला केला होता. यात कृष्णा कुट्टीकर यांचा पंजा छाटला गेला होता. त्यांच्यावर सध्या गोमेकॉत उपचार सुरु आहेत. या हल्ल्यानंतर वरील चारही संशयितांविरोधात जुने गोवे पोलिसांनी गुन्हा नोंद केला होता.संशयितांचा शोध घेण्यासाठी जुने गोवे निरीक्षक जिवबा दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक शिवराम गावस, सुदिन गावस, कॉन्स्टेबल मयुर असोलकर, रजत कुट्टीकर, अनिकेत देविदास यांचे पथक स्थापन करण्यात आले होते.

जॅक, कमलेश व मनीष हे संशयित गोव्यातून फरार होण्यासाठी मडगाव रेल्वेस्थानकावर जात असल्याची माहिती मिळताच त्यांना रेल्वेस्थानकावरुन अटक करण्यात आली. तर पणजी पोलिसांनी चौथा संशयित गौरीश याला अटक केली. सर्व संशयितांना पोलिस कोठडीत पाठवण्यात आले आहे.