Thu, Oct 01, 2020 03:41होमपेज › Goa › गोवा :आमदार दयानंद सोपटेंनी मराठीतून घेतली शपथ

गोवा :दयानंद सोपटेंनी मराठीतून घेतली शपथ

Published On: May 29 2019 2:09AM | Last Updated: May 29 2019 1:25PM

चार नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधीपणजी : प्रतिनिधी

राज्य विधानसभेेच्या चार मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीत निवडून आलेल्या चार आमदारांना मंगळवारी हंगामी सभापती मायकल लोबो यांनी गोपनियतेची शपथ दिली. या चार आमदारांच्या समावेशामुळे राज्य विधानसभेच्या सदस्यांची संख्या पूर्ववत चाळीस झाली आहे. विशेष म्‍हणजे, आमदार म्हणून दयानंद सोपटे मराठीतून शपथ घेतली. याबाबत ट्‍विटरवर #मराठीशपथ असा हॅशटॅग ट्रेंड होता. नेटिझन्‍सकडून हा हॅशटॅग वापरण्‍यात येत होता. 

पर्वरी येथील विधानसभा संकुलाच्या सभागृहात मंगळवारी सकाळी 11 वाजता चार नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी सोहळा पार पडला. हंगामी सभापती लोबो यांनी सर्वात आधी मांद्रे मतदारसंघाचे आमदार म्हणून दयानंद सोपटे यांना शपथ दिली. सोपटे यांनी मराठीतून शपथ घेतली. त्यानंतर, म्हापशाचे आमदार म्हणून जोशुआ डिसोझा, पणजीचे आमदार म्हणून अतानसिओ मोन्सेरात आणि शिरोडा मतदारसंघाचे आमदार म्हणुन सुभाष शिरोडकर यांनी शपथ घेतली. सोपटे यांनी मराठी, शिरोडकर यांनी कोकणी तर डिसोझा आणि मोन्सेरात यांनी इंग्रजीतून शपथ घेतली. 
या सोहळ्यानंतर लोबो आणि मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी नवनिर्वाचित आमदारांचे अभिनंदन केले. सावंत म्हणाले की, नव्याने निवडून आलेल्या चारही आमदारांनी उर्वरीत तीन वर्षाचा कार्यकाळ आपल्या मतदारसंघाच्या विकासासाठी पावले टाकावीत. 

या कार्यक्रमाला विरोधी पक्षनेते चंद्रकांत कवळेकर, उपमुख्यमंत्री मनोहर आजगावकर, मंत्री मिलींद नाईक, माविन गुदिन्हो, रोहन खंवटे, जयेश साळगावकर, आलिना साल्ढाना , चर्चिल आलेमाव, भाजपचे सरचिटणीस सदानंद तानावडे व अन्य मान्यवर उपस्थित होते. नवनिर्वाचित आमदारांना शुभेच्छा देण्यासाठी त्या-त्या मतदारसंघातील लोकांनीही गर्दी केली होती. 

खातेवाटप लवकरच : सावंत

निवडणुकीमुळे लागू असलेली आचारसंहिता नुकतीच संपली असून राज्य मंत्रिमंडळातील मंत्र्यांना नव्याने खातेवाटप लवकरच होणार आहे. मंत्र्यांकडील असलेली काही खात्यातही बदल होण्याची शक्यता असल्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सांगितले.