होमपेज › Goa › गोवा विद्यापीठची ‘ती’ वादग्रस्त जाहिरात मागे 

गोवा विद्यापीठची ‘ती’ वादग्रस्त जाहिरात मागे 

Published On: May 17 2019 1:45AM | Last Updated: May 17 2019 1:45AM
पणजी : प्रतिनिधी

शिक्षकांची रिक्त पदे भरण्यासाठी 15 वर्षांचा रहिवासी दाखला न मागितल्याने वादाच्या भोवर्‍यात सापडलेली नोकर भरतीची वादग्रस्त जाहिरात अखेर गोवा विद्यापीठाने मागे घेतली आहे. यासंदर्भात विद्यापीठाच्या निबंधकांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे माहिती दिली आहे. 

गोवा विद्यापीठाने 85 शिक्षकांची रिक्त पदे भरण्यासाठी 8 मार्च 2019 रोजी वर्तमानपत्रांमध्ये तीन वेगवेगळ्या जाहिराती प्रसिद्ध केल्या होत्या. या सर्व जाहिराती मागे घेण्यात आल्याचे या प्रसिद्धी पत्रकात नमूद करण्यात आले आहे. 

गोवा विद्यापीठातील 82 रिक्त पदे भरण्यासाठी काही दिवसांपूर्वी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. मात्र, या जाहिरातीत इच्छुक उमेदवारांकडून 15 वर्षांचा रहिवासी दाखला मागण्यात आला नव्हता. प्रत्यक्षात सरकारी नोकरीसाठी 15 वर्षांचा रहिवासी दाखला सक्तीचा आहे. मात्र, गोवा विद्यापीठाकडून हा नियम डावलण्यात आला. त्यामुळे या जागांवर परप्रांतीय उमेदवारदेखील अर्ज करण्याची शक्यता असल्याची चिंता गोवा यूथ फॉरवर्डकडून व्यक्त करण्यात आली होती. 

गोवा यूथ फॉरवर्डने या जाहिरातीला तीव्र विरोध केला होता. रहिवासी दाखल्याची सक्ती करावी, अशी मागणी करणारे निवेदन गोवा यूथ फॉरवर्डच्या शिष्टमंडळाने सोमवारी गोवा विद्यापीठाच्या कुलपती तथा राज्यपाल डॉ. मृदुला सिन्हा यांना सादर केले होते. 

गोमंतकीयांना या पदांवर संधी मिळू नये, यासाठी हे सर्व मुद्दामहून करण्यात आल्याचाही आरोप यावेळी करण्यात आला होता. या विषयावरून गोवा युवक काँग्रेसतर्फे गोवा विद्यापीठाच्या निबंधकांनादेखील घेराव घालण्यात आला होता.