Mon, Sep 21, 2020 06:11होमपेज › Goa › अर्थसंकल्पात ग्रामीण विकासावर भर

अर्थसंकल्पात ग्रामीण विकासावर भर

Last Updated: Jan 28 2020 2:18AM
पणजी : पुढारी वृत्तसेवा
राज्याचा 2020-21 सालचा अर्थसंकल्प 6 फेब्रुवारी-2020 रोजी विधानसभेच्या अधिवेशनात मांडला जाणार असून यंदाच्या अर्थसंकल्पात रोजगार निर्मितीपेक्षा ग्रामीण भागातील विकासावर अधिक लक्ष केंद्रित केले जाणार आहे. खाण उद्योगातून मिळणारा महसूल यंदा कमी प्रमाणात का होईना पण मिळणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सोमवारी दिली.

पर्वरी येथील विधानसभा संकुलात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री बोलत होते. ते म्हणाले की, युवकांना रोजगार देणे हा अर्थसंकल्पाचा विषय होऊ शकत नाही. समाजातील सर्व घटकांचा आणि सर्वसमावेशक विकासाचा अर्थसंकल्पात विचार केला जाणार आहे. त्यात खास करुन ग्रामीण भागातील विकासाला अर्थसंकल्पात प्राधान्य दिले जाणार आहे. खाण उद्योगातून जास्त नसला तरी थोडाफार महसूल प्राप्त होईल असा आपला विश्‍वास आहे. पर्यटन धोरणही लवकरच तयार केले जाणार आहे. अर्थसंकल्पाबाबत राज्यातील अनेक उद्योजक, खनिज संघटना, गोवा चेंबर्स ऑफ कॅामर्सचे प्रतिनिधी आपल्याला भेटले आहेत. 

मागील अर्थसंकल्पात विविध खात्यांसाठी केलेल्या तरतुदींचा वापर झाला की नाही, किती प्रमाणात झाला या सर्वांचा अहवाल मागितला आहे. यंदाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन पाचच दिवसांचे असले तरी पुढील वर्षी त्याचा कालावधी मोठा ठेवण्याचा सरकारचा विचार आहे. 

लोकायुक्त कार्यालयाने 88 खाणींच्या लिजच्या दुसर्‍या नूतनीकरणाबाबत दिलेला अहवाल राज्याचे अ‍ॅटर्नी जनरल देविदास पांगम यांच्याकडे मतप्रदर्शनासाठी पाठवण्यात आला असल्याचे मुख्यमंत्री सावंत यांनी सांगितले. यावेळी अर्थ खात्याचे सचिव दौलत हवालदार उपस्थित होते.

सूचनांसाठी वेब पोर्टल
राज्य सरकारच्या अर्थसंकल्पासाठी विविध घटकांकडून सूचना-शिफारशी घेण्यासाठी पहिल्यांदाच व्यासपीठ उपलब्ध करण्यात आले आहे. यासाठी अर्थसंकल्पावर सूचना करण्यासाठी खास ‘वेब पोर्टल’ खोलण्यात आले असून 31 जानेवारीला संध्याकाळी 6 वाजेपर्यंत सदर पोर्टल खुले ठेवले जाणार आहे. विरोधी पक्षांनाही सूचना द्याव्यात. सरकारला वारंवार न्यायालयात खेचणार्‍या एनजीओंनीही दिलेल्या शिफारशींचा सरकारकडून अभ्यास करुन त्यांचा अर्थसंकल्पात समोवश करण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले.

 "