Thu, Oct 01, 2020 05:09होमपेज › Goa › गोमंतकीय संस्कृती टिकवून ठेवण्यासाठी सराकार प्रयत्नशील : कृषीमंत्री विजय सरदेसाई 

गोमंतकीय संस्कृती टिकवून ठेवण्यासाठी सराकार प्रयत्नशील : कृषीमंत्री विजय सरदेसाई 

Published On: Feb 22 2019 8:27PM | Last Updated: Feb 23 2019 1:37AM
मडगाव : प्रतिनिधी

दिवसेंदिवस नष्ट होत चाललेली मूळ गोमंतकीयांची संस्कृती टिकवून ठेवण्यासाठी २०२० पर्यत सरकारद्वारे ठोस पाऊले उचलण्यात येणार आहेत. या अनुषंगाने कोलवा सर्कलच्या नजीक अर्थव्यवस्थेला परिपूर्ण असे सांस्कृतिक मॉडेल तयार करण्यात येणार आहे अशी माहिती कृषीमंत्री विजय सरदेसाई यांनी दिली. 

बरेभाट सामाजिक व सांस्कृतिक संस्थेने, पर्यटन खाते, कला व सांस्कृतिक खाते, आदिवासी कल्याण खाते, कृषी खाते आणि राया ग्रामपंचायत यांच्या सहकार्याने आयोजित केलेल्या चौथ्या लोकउत्सव कार्यक्रमात 'आमचो गांव' या संकल्पनेवर तयार केलेल्या मांडवाचे उदघाटन झाल्यानंतर ते बोलत होते. यावेळी कुडतरीचे आमदार आलेक्स रेजिनाल्ड लोरेंसो, मडगाव पालिकेचे उपनगराध्यक्ष टिटो कार्डोज, नगरसेवक पीटर फेर्नांडिस व इतर उपस्थित होते. यावेळी स्थानिक तसेच अनुसूचित जाती जमातीच्या लोकांनी पारंपरिक खाद्यपदार्थ, केरसुणी, खाटा आदींचे स्टॉल्स उभारले होते. 

गोव्याच्या पुढच्या पिढीसाठी गोव्याची संस्कृती टिकवून ठेवणे हे सर्वांचे कर्तव्य आहे. सरकार यादृष्टीने पाऊले उचलत असून २०२० पर्यत याविषयी ठोस पाऊले उचलली जातील असे त्यांनी सांगितले. कोलवा सर्कल जवळ पारंपरिक खाद्यपदार्थ आणि इतर गोमंतकीय वस्तूंचे सांस्कृतिक मॉडेल उभारण्यात येणार असेही ते म्हणाले. रायच्या लोकांनी लोकउत्सव आयोजित करून गोयकारपण टिकवून ठेवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केल्याबद्दल त्यांनी सर्वांचे अभिनंदन केले. 

गोमंतकीय गोव्याची सांस्कृती व परंपरा विसरत चालले आहे यामुळे अशा लोकानी लोकउत्सवात सहभागी होऊन परंपरेचे महत्व जाणून घ्यावे असे मत रेजिनाल्ड यांनी व्यक्त केले. गोव्याची संस्कृती कालबाह्य होण्यापूर्वी सरकारने यावर योग्य विचार करण्याची गरज आहे असेही ते म्हणाले. यावेळी लोकनृत्याचाही कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.