Mon, Sep 21, 2020 04:42होमपेज › Goa › थिवीत भावंडांच्या अपहरणाचा प्रयत्न फसला; संशयित अटकेत

थिवीत भावंडांच्या अपहरणाचा प्रयत्न फसला; संशयित अटकेत

Last Updated: Jan 24 2020 2:13AM
म्हापसा : पुढारी वृत्तसेवा

शिकवणी वर्ग संपवून घराकडे निघालेल्या 12 व 14 वर्षे वयाच्या भावाबहिणीचे अपहरण करण्याच्या प्रयत्नात असलेल्या विश्‍वजित पांडे (वय 28, मूळ रा.ओडिशा) व शनो राजबर (24 मूळ रा. उत्तर प्रदेश) या दोघा संशयितांना विद्यार्थ्यांनी स्थानिकांच्या मदतीने चपळाई दाखवून पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. 

या प्रकरणी संशयिताची कारही पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. सदर घटना बुधवारी (दि. 22) संध्याकाळी 5.15 वाजता थिवी येथील सेंट अ‍ॅना विद्यालयाजवळ घडली. शिकवणी संपवून घरी येत असता     जीए 03 डल्ब्यू 5454  या रेंट कॅबमधून संशयित सदर भावंडांना शोधत आले. कारमधील एकाने मुलाच्या हाताला धरून गाडीत खेचण्याचा प्रयत्न केला असता बहिणीने भावाला ओढून आपल्याकडे घेतले व त्याची सुटका केली. ही घटना पाठीमागून येणार्‍या शिक्षिकेला सांगितली.

शिक्षिकेने विद्यार्थ्यांसह घटनास्थळावर येऊन अपहरणाच्या प्रयत्नात असलेल्या व्यक्तींचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. एका चाणाक्ष विद्यार्थ्याने सदर कारचा नंबर लिहून घेतला होता. सदर कार याच भागात फिरत असल्याचे दिसून आल्यावर विद्यार्थ्यांनी कार अडवली व त्यातील दोघांना प्रश्‍न विचारले. इतक्यात सभोवतालचे लोक तिथे आले व त्यांनीही प्रश्‍नांची सरबत्ती सुरू करताच संशयित गांगरले व प्रश्‍नांची समाधानकारक उत्तरेे देऊ शकले नाहीत.

दरम्यान, म्हापसा पोलिसांना खबर मिळताच ते घटनास्थळी आले आणि संशयित विश्‍वजित पांडे व शनो राजबर या दोघांनाही ताब्यात घेतले. संशयितांविरोधात भा.दं.सं. कलम 363 व बाल कायद्याच्या कलम 8 नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. म्हापसा पोलिस स्थानकाचे उपनिरीक्षक दीक्षा कळंगुटकर अधिक तपास करीत आहेत. 


 

 "