Mon, Sep 21, 2020 04:09होमपेज › Goa › भाजपकडे मुद्दे नसल्याने बाबूश मोन्सेरात यांच्यावरील गुन्ह्यांचा विषय पुढे  

भाजपकडे मुद्दे नसल्याने बाबूश मोन्सेरात यांच्यावरील गुन्ह्यांचा विषय पुढे  

Published On: May 11 2019 2:03AM | Last Updated: May 10 2019 7:27PM
पणजी:  प्रतिनिधी

पणजी पोटनिवडणूकीत भाजपकडे मुद्दे नाहीत. त्यामुळेच लक्ष वळवण्यासाठी भाजपकडून काँग्रेस उमेदवार बाबूश मोन्सेरात यांच्यावर नोंद असलेल्या गुन्ह्यांचा विषय पुढे  केला जात असल्याचा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी पत्रकार परिषदेत केला.

पणजी पोटनिवडणूकीत भाजप कार्यकर्त्यांचा मोन्सेरात यांना खुला पाठींबा आहे. मोन्सेरात यांना उमेदवारी मिळावी ही मतदारांची इच्छा होती असेही त्यांनी सांगितले. 

चोडणकर म्हणाले, या पोटनिवडणूकीत पणजी भाजपचे तीन गट झाले आहेत.  एक गट मोन्सेरात यांच्या सोबत, एक गट गोवा सुरक्षा मंचचे उमेदवार सुभाष वेलिंगकर यांच्यासोबत तर एक गट भाजपचे उमेदवार सिध्दार्थ कुंकळ्येकर यांच्यासोबत आहे. भाजप कार्यकर्त्यांचा त्यांच्याच उमेदवाराला पाठींबा मिळत नसल्याने ते वैफल्यग्रस्त बनले असल्याची टीका चोडणकर यांनी केली.

पणजी मागील २५ वर्षापासून भाजपकडे आहे. या मतदारसंघाचे आमदार हे केंद्रीय मंत्री, मुख्यमंत्री तसेच विरोधी पक्षनेते देखील होते. मात्र असे असूनही पणजी विकासापासून फार दुर राहिली. शहरात 2 तास पाणी पुरवठा देखील होत नाही.  याशिवाय कचरा समस्या जैसे थे आहे. मात्र या विषयांवर बोलण्यापेक्षा भाजपकडून मोन्सेरात यांच्याविरोधात नोंद असलेल्या गुन्ह्यांबाबत बोलले जात असल्याचा आरोप चोडणकर यांनी केला.