Thu, Oct 01, 2020 03:43होमपेज › Goa › कोकण रेल्वेमुळे गोव्याचा विकास : श्रीपाद नाईक 

कोकण रेल्वेमुळे गोव्याचा विकास : श्रीपाद नाईक 

Published On: Mar 07 2019 8:36PM | Last Updated: Mar 07 2019 8:36PM
मडगाव : प्रतिनिधी

कोकण रेल्वेमुळे गोव्याचा खऱ्या अर्थाने विकास झालेला आहे. रेल्वेच्या माध्यमातून लोकांना योग्य प्रकारच्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी राज्याच्या तिन्ही खासदारांनी खासदार निधीतून कोट्यवधी रुपये गेल्या पाच वर्षांत रेल्वेच्या साधन सुविधांवर खर्च केलेले आहेत. कोकण रेल्वे अविरतपणे सुरू राहावी, त्याच बरोबर रेल्वे कर्मचाऱ्यांनी आपली नोकरी म्हणजे काम नसून एक मिशन आहे या दृष्टिकोनातून कार्य करावे, असे प्रतिपादन केंद्रीय आयुष मंत्री श्रीपाद नाईक यांनी केले.

मडगाव कोकण रेल्वे स्थानकावर आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात श्रीपाद नाईक बोलत होते. या वेळी दक्षिण गोव्याचे लोकसभा खासदार नरेंद्र सावईकर, राज्यसभा खासदार विनय तेंडुलकर, मडगाव नगरपालिकेच्या नगराध्यक्षा बबिता आंगले, जिल्हा पंचायत सदस्य उल्लास तुएकर व इतर उपस्थित होते. केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, खासदार नरेंद्र सावईकर आणि विनय तेंडुलकर यांच्या हस्ते मडगाव रेल्वे स्थानकाबरोबर इतर रेल्वे स्थानकावर खासदार निधीतून सुरुवात करण्यात आलेल्या विविध कामाची पायाभरणी करण्यात आली. 

हा कार्यक्रम दोन वर्षांपूर्वी होणार होता. लोकसभा निवडणूक झाल्यानंतर आपल्याकडे पर्यटन खात्याचे स्वतंत्र मंत्रीपद देण्यात आले होते. या खात्याच्या माध्यमातून राज्यात पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी आपण योजना आखल्या होत्या. पर्यटकांना आणि ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी रेल्वे स्थानकांवर २५ कोटीच्या योजना अंमलात आणल्या गेल्या होत्या. पण मध्यंतरी आपल्या हातून हे खाते काढून घेण्यात आल्याने हा प्रकल्प मार्गी लागण्यास विलंब झाला अशी खंत नाईक यांनी व्यक्त केली.

या पंचवीस कोटी पैकी चौदा कोटी मडगाव ते माजोर्ड रेल्वे स्थानकावर खर्च होणार आहेत. अडीज कोटी करमळी तर  साडेआठ कोटी थिवी रेल्वे स्थानकावर खर्च होणार असल्याची माहिती श्रीपाद नाईक यांनी दिली. आता पर्यंत जुने गोवे, थिवी आणि पेडणे रेल्वे स्थानकाच्या विकासासाठी सुमारे एक कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. सामान्य लोकांना सुविधा मिळाव्यात यासाठी सर्व खासदार आपल्या निधीतून पैसे खर्च करत आहेत असे ते म्हणाले.