Mon, Sep 21, 2020 04:20होमपेज › Goa › भाजपच्या प्रचारसभेत आज उपमुख्यमंत्री सरदेसाई

भाजपच्या प्रचारसभेत आज उपमुख्यमंत्री सरदेसाई

Published On: Apr 20 2019 1:52AM | Last Updated: Apr 20 2019 1:52AM
मडगाव : प्रतिनिधी

येथील लोहिया मैदानावर, कुडचडे बस स्थानकावर आणि सांगे येथील बस स्थानकावर आज शनिवारी जाहीर सभा आयोजित करण्यात आल्या असून लोहिया मैदानावरील जाहीर सभेत गोवा फॉरवर्डचे सर्वेसर्वा तथा उपमुख्यमंत्री विजय सरदेसाई पहिल्यांदाच प्रचारात सहभागी होणार असल्याने या सभेकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.  

भाजप प्रवक्‍ते रूपेश महात्मे यांनी दिलेल्या माहितीनुसार  मडगावशिवाय कुडचडे मतदारसंघात वीजमंत्री नीलेश काब्राल यांच्या अध्यक्षतेखाली बसस्थानकावर सभा आयोजित करण्यात आलेली आहे. सांगेत सायंकाळी सात वाजता सभा आयोजित करण्यात आली आहे.

सरकारमधील घटक पक्ष असलेल्या गोवा फॉरवर्डचे नेते तथा मंत्री विजय सरदेसाई हे भाजपच्या प्रचारापासून दूर होते. बुधवारी भाजप प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर यांनी सरदेसाई यांची भेट घेऊन त्यांची मनधरणी केल्यानंतर त्यांनी आपल्या समर्थकांना भाजपला पाठिंबा देण्याचे आवाहन केले. शनिवारच्या सभेत ते पहिल्यांदाच भाजपच्या   व्यासपीठावर येत आहेत.

वेळेअभावी केपेतील सभा रद्द

मडगाव, सांगे, कुडचडेतील  जाहीर सभांच्या माध्यमातून भाजप दक्षिण गोव्यात शनिवारी शक्‍तिप्रदर्शन करणार आहे.भाजपचे दक्षिण गोवा प्रचार प्रमुख सर्वानंद भगत यांनी दिलेल्या माहितीनुसार वेळेअभावी केपेमधील सभा रद्द करण्यात आलेली आहे.