Mon, Sep 21, 2020 05:13होमपेज › Goa › हॉटेल्सच्या जीएसटीत घट

हॉटेल्सच्या जीएसटीत घट

Published On: Sep 21 2019 1:30AM | Last Updated: Sep 23 2019 1:53AM
पणजी : प्रतिनिधी

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी हॉटेलातील खोल्यांना लागू असलेल्या ‘वस्तू व सेवा करात’ (जीएसटी) मोठी कपात जाहीर केली आहे. एक हजाराहून कमी भाडे असलेल्या खोलीसाठी आता जीएसटी लागू नसेल. 7500 रुपयांपर्यंत भाडे असलेल्या खोलीसाठी लागू असलेल्या 18 टक्के जीएसटीत कपात करून तो 12 टक्क्यांवर आणण्यात आला आहे. तर 7500 रुपयांहून अधिक भाडे असलेल्या खोलीसाठी जीएसटी 28 वरून 18 टक्के असा कमी करण्यात आला आहे. 

जुने गोवे येथील एका हॉटेलात शुक्रवारी जीएसटी मंडळाची बैठक पार पडल्यानंतर रात्री उशिरा घेतलेल्या पत्रकार परिषदेत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी जीएसटी कपातीची घोषणा केली.गोव्याचे पंचायतमंत्री माविन गुदिन्हो आणि अन्य सहकार्‍यांनी हॉटेल्सना लागू असलेला जीएसटी कमी करण्यासाठी केलेल्या सादरीकरणाचे मंत्री सीतारामन यांनी कौतुक केले. देशातील हॉटेल्सना सध्या 18 ते 28 टक्के जीएसटी लागू आहे. हे दर आता शून्य ते 18 असे लागू होणार असल्याचे सीतारामन यांनी सांगितले. 

सीतारामन म्हणाल्या की, देशातील पर्यटनाला चालना मिळण्याची गरज असून हॉटेल खोल्यांवरील कर कमी झाल्याने देशी तसेच विदेशी पर्यटकांचा भारताकडे ओढा वाढणार आहे. यामुळे अर्थव्यवस्था अधिक बलवान बनणार आहे. हॉटेल भाड्यावरील जीएसटीचे आता तीन गटांत वर्गीकरण करण्यात आले आहे. स्वस्त दरातील, म्हणजे एक हजार रुपयांहून कमी शुल्क असलेल्या हॉटेल खोल्यांवरील जीएसटी ‘शून्य’ करण्यात आला आहे. 1001 ते 7500 रु. शुल्क असलेल्या खोल्यांना 12 टक्के आणि 7500 रु. हून अधिक भाडे असलेल्या हॉटेलातील खोल्यांना 18 टक्के जीएसटी लागू करण्यात आलाआहे. 

‘केटरिंग ’ व्यवसायाला दिलासा देताना जीएसटी 18 टक्क्यांवरून 5 टक्के करण्यात आला आहे. मात्र, 7500 रु.हून अधिक भाडे असलेल्या खोल्यात केटरिंग सेवा पुरवल्यास 18 टक्के जीएसटी लागू होणार असल्याचे सीतारामन यांनी सांगितले.

पर्यटन व्यवसायाला दिलासा : मुख्यमंत्री 

जीएसटी परिषदेकडून गोव्याच्या पर्यटन व्यवसायाला दिलासा मिळण्याची आशा होती. ही आशा खरी ठरली आहे. हॉटेलावरील जीएसटी 28 वरून 18 टक्क्यांवर आणला, हे दिलासादायक आहे. यामुळे राज्याच्या पर्यटन क्षेत्राला नवी ऊर्जा मिळणार आहे. फिशमीलवरील जीएसटी 5 टक्क्यांवरून ‘शून्या’वर आल्याने निर्यातदारांना फायदा होणार आहे. कॅसिनोवरील जीएसटीबाबत कोणताही बदल करण्यात आला नाही, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले.