Sun, Aug 09, 2020 05:29होमपेज › Goa › जमावबंदी अधिसूचना मागे घेण्याबाबत विचार : मुख्यमंत्री

जमावबंदी अधिसूचना मागे घेण्याबाबत विचार : मुख्यमंत्री

Last Updated: Feb 16 2020 1:47AM
पणजी : पुढारी वृत्तसेवा 

राज्याला दहशतवादी हल्ल्यांचा धोका नाही. त्यामुळे राज्यात लागू करण्यात आलेले जमावबंदी संदर्भातील कलम 144 हटवण्याचा विचार केला जात असल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी शनिवारी पणजीत आयोजित एका कार्यक्रमावेळी सांगितले.

राज्यात कलम 144 लागू करणारी अधिसूचना जिल्हाधिकार्‍यांनी काही दिवसांपूर्वी जारी केली होती. राज्यात सध्या कानिर्व्हल तसेच शिमगोत्सवाचे आयोजन केले जाणार आहे. त्यातच अशा प्रकारची अधिसूचना जारी करण्यात आल्याने विरोधी पक्षांसह सर्व स्तरातून विरोध होत आहे. सदर अधिसूचना मागे घेण्यात यावी, अशी मागणीही केली जात आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले की, राज्याला दहशतवादी हल्ल्यांचा धोका असल्याचा इशारा गुप्तचर विभागाने दिला होता. त्यामुळे राज्यात 144 कलम लागू करण्यात आले आहे. मात्र, आता कलम 144 संदर्भात जारी

करण्यात आलेल्या अधिसूचनेचा पुन्हा एकदा आढावा घेतला जाणार आहे. राज्याला दहशतवादी कारवायांचा सध्या तरी धोका नाही. त्यामुळे ही अधिसूचना मागे घेण्याबाबत विचार केला जात आहे. त्यासंदर्भात लवकरच निर्णय घेतला जाईल.

उत्तर व दक्षिण गोवा जिल्हाधिकार्‍यांनी राज्यात कलम 144 लागू करण्यासंदर्भातील अधिसूचना जारी केली होती. दहशतवादी कारवायांबरोबरच समाजकंटकांकडून गुन्हेगारी घटना घडवण्याचीही शक्यता वाटल्याने ही अधिसूचना जारी करण्यात आली होती. सदर अधिसूचना ही नित्याची प्रक्रिया आहे. मात्र, प्रसारमाध्यमांकडून कलम 144 संदर्भात जारी करण्यात आलेल्या या अधिसूचनेला फार प्रसिद्धी देण्यात आली. या अधिसूचनेबाबत उत्तर व दक्षिण गोवा जिल्हाधिकार्‍यांसोबत चर्चा करण्यात आली असून त्याचा आढावा घेतला जाणार आहे. त्यानंतर ती मागे घेण्याबाबत निर्णय घेतला जाईल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.