Mon, Sep 21, 2020 05:50होमपेज › Goa › मुख्यमंत्री पर्रीकर मंत्रालयात

मुख्यमंत्री पर्रीकर मंत्रालयात

Published On: Jan 02 2019 1:56AM | Last Updated: Jan 02 2019 12:37AM
पणजी : प्रतिनिधी

मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर सुमारे साडेचार महिन्यांच्या खंडानंतर मंगळवारी पर्वरी येथील मंत्रालयातील आपल्या कार्यालयात दाखल झाले. मंत्रिमंडळातील सहकारी, अधिकार्‍यांशी चर्चा करून त्यांनी काही फाईलींवर स्वाक्षर्‍या केल्या. सरकारी नोकरभरतीबाबत  असलेल्या अडचणी दूर करण्यासाठी पर्रीकर यांनी  अधिकार्‍यांना महत्त्वाच्या सूचना दिल्याचे सूत्रांनी सांगितले. 

नववर्षाच्या पहिल्या दिवशी, मंगळवारी सकाळी 10.45 वाजता मुख्यमंत्री पर्रीकर मंत्रालयात दाखल झाले. मंत्रालयासमोर मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या भाजपच्या कार्यकर्त्यांनी ‘पर्रीकर तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है’ अशी घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला. सभापती डॉ. प्रमोद सावंत, मंत्री माविन गुदिन्हो, मंत्री मिलींद नाईक, मंत्री नीलेश काब्राल, माजी आमदार किरण कांदोळकर आदींनी पर्रीकरांचे स्वागत केले. भाजप संघटनमंत्री सतीश धोंड तसेच मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातील कर्मचारीही यावेळी हजर होते. पर्रीकर यांनी आपल्या कार्यालयात  आल्यावर प्रशासकीय अधिकार्‍यांच्या बैठका घेतल्या. त्यांनी काही महत्वाच्या फाईली पाहून त्यावर सह्या केल्या. कार्मिक खात्याच्या अधिकार्‍यांना मुख्यमंत्र्यांना विविध सरकारी खात्यातील रिक्त जागा, बढत्या आदींची माहिती दिली. पणजी महानगरपालिका आणि म्हापसा पालिकेच्या नगरसेवकांनीही पर्रीकरांची भेट घेतली. पर्रीकर यांनी सुमारे सव्वातास मंत्रालयात अनेकांच्या भेटी घेतल्या आणि काही कामे हातावेगळी केली. 

गेल्या चतुर्थीच्या सणापूर्वी म्हणजे 8 ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री शेवटचे मंत्रालयात आले होते. पर्रीकर येणार असल्याची कल्पना त्यांच्या कार्यालयातील काही मोजक्याच कर्मचार्‍यांना दिली गेली होती. त्यामुळे ते कर्मचारी मंत्रालयाच्या खाली मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी थांबले होते. मंत्रालयात आलेल्या भाजप कार्यकर्त्यांच्या आग्रहावरून पर्रीकर यांनी सभागृहात येऊन त्यांच्याशी बातचीत केली. 

पर्रीकर  स्वादूपिंडाच्या कॅन्सरवर उपचार घेत आहेत. 2018 सालचे नऊ महिने त्यांना रुग्णालयात व घरी घालवावे लागले. उपचारांसाठी बहुतांश वेळ गेला. आता त्यांच्या प्रकृतीत थोडी सुधारणा झालेली आहे, असे सूत्रांनी सांगितले.

विरोधकांना कृतीतून उत्तर 

मुख्यमंत्री पर्रीकर यांनी आपल्या करंजाळे येथील खासगी निवासस्थानीच मंत्रिमंडळाच्या बैठका घेतल्या. मुख्यमंत्र्यांच्या आजारपणामुळे प्रशासन ठप्प झाल्याची टीका विरोधकांकडून व खास करून काँग्रेसकडून सातत्याने होत होती. पर्रीकर यांनी हल्लीच नव्या तिसर्‍या मांडवी पुलावर जाऊन त्या कामाची पाहणी केली होती. नववर्षाच्या पहिल्या दिवशी पर्रीकर यांनी निवासस्थानी परतताना गाडीतून उतरून पुन्हा तिसर्‍या मांडवी पुलाची पाहणी केली. आपल्या मंगळवारच्या कृतीने त्यांनी विरोधकांना अप्रत्यक्षरीत्या उत्तर दिले असल्याची चर्चा भरात आली आहे.