Thu, Oct 01, 2020 05:01होमपेज › Goa › चाचणी मतदानात भाजपलाच मते ?

चाचणी मतदानात भाजपलाच मते ?

Published On: Apr 24 2019 1:37AM | Last Updated: Apr 24 2019 1:37AM
मडगाव : प्रतिनिधी 

दक्षिण गोव्यातील तळेभाट-कुंकळ्ळीतील मतदान केंद्रात मतदान यंत्र चाचणी मतदानावेळी भाजपच्या उमेदवारांनाच मते जात असल्याची तक्रार करण्यात आल्याने प्रशासनाला ‘ईव्हीएम’ यंत्र बदलावे लागले. या गोंधळात अडीच तास उशिराने मतदान प्रक्रिया सुरू झाली. 

प्राप्त माहितीनुसार निवडणूक यंत्राच्या चाचणीसाठी झालेल्या मतदानात भाजप आणि काँग्रेसच्या बाजूने मतदान होण्याचा प्रकार घडत असल्याचे मतदारांनी लक्षात आणून दिले. यामुळे कुंकळ्ळी मतदार संघातील तळेभाट मतदान केंद्रावर काही काळ गोंधळ उडाला. या प्रकाराची तक्रार निवडणूक आयोगाकडे करण्यात आली. त्यानंतर जिल्हाधिकारी अजित रॉय यांनी 

तातडीने मतदान केंद्रावर धाव घेऊन लगेच मतदान यंत्र बदलून दिले. या प्रकारामुळे तळेभाट मतदान केंद्रावरील निवडणूक प्रक्रिया अडीच तास उशिराने सुरू झाली. त्यामुळे काही मतदार मतदान न करता परत गेले. सकाळी सात वाजता निवडणूक प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी मतदान यंत्राची चाचणी केली जाते. तळेभाट येथील 31 क्रमांकाच्या मतदान केंद्रावर निवडणूक अधिकार्‍यांनी सर्व सहाही उमेदवारांच्या बाजूने प्रत्येकी नऊ मते घालून मतदान यंत्राची चाचणी केली असता चाचणीसाठी केलेली मते सर्व उमेदवारांना समान पद्धतीने न जाता काही उमेदवारांच्या खात्यात जास्त तर काही उमेदवारांच्या खात्यात कमी मते पडल्याचे आढळून आले.त्यांनी या प्रकाराची चौकशी केली असता भाजप उमेदवाराच्या खात्यात सर्वात जास्त सतरा मते गेल्याचे समोर आले. त्यानंतर काँग्रेसला नऊ, आपला आठ, आणि एका अपक्ष उमेदवाराच्या खात्यात एक मत पडल्याचे अधिकार्‍यांना दिसून आले.

यावेळी मतदान यंत्राची तपासणी करताना अर्धा तास वाया गेला. सकाळी सातला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी आलेल्या लोकांची बरीच रांग लांबलेली होती. या प्रकाराची माहिती ‘आप’च्या निवडणूक एजंटने दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार एल्विस गोम्स यांना दिली. त्यानंतर त्यांनी तातडीने मतदान केंद्रावर धाव घेतली. अधिकार्‍यांनी केलेल्या तपासणीत मतदान केंद्रावरील गोंधळ त्यांच्या लक्षात आला. या प्रकरणी त्यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली. सकाळी 9 वाजता दक्षिण गोवा जिल्हाधिकारी तथा निवडणूक अधिकारी अजित रॉय या केंद्रावर दाखल झाले. त्यांनी संपूर्ण घटनेचा आढावा घेतला. मतदान यंत्र बदलण्याची सूचना अधिकार्‍यांना केली. यावर पत्रकारांशी बोलताना अजित रॉय यांनी मतदान न करता गेलेल्या मतदारांशी संपर्क साधून त्यांना मतदान करण्यासाठी जास्त वेळ दिला जाईल, अशी माहिती दिली आहे. तर या प्रकरणाची चौकशी व्हावी, अशी मागणी एल्विस गोम्स यांनी केली 
आहे.