Sun, Sep 20, 2020 10:55होमपेज › Goa › गोव्यात भाजपला अर्धे यश

गोव्यात भाजपला अर्धे यश

Published On: May 29 2019 2:09AM | Last Updated: May 29 2019 2:09AM
सुरेश नाईक

लोकसभेच्या ताज्या निवडणुकीत गोव्यातील दोनपैकी उत्तर गोवा मतदारसंघ राखण्यात भाजपला यश मिळाले. सलग पाचवा विजय संपादन करण्यात केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक यशस्वी ठरले, तरी त्यांना गेल्यावेळचे मताधिक्य राखता आले नाही. काँग्रेसचे गिरीश चोडणकर यांना 2014 च्या तुलनेत अधिक मते मिळाली.

उत्तर गोवा मतदारसंघातील वीस विधानसभा विभागापैकी भाजप (9), मगोप (1), गोवा फॉरवर्ड (2) अपक्ष (2) व काँग्रेसचा भाजप दाखल झालेल्या आमदाराचा एक अशा पंधरा विभागांत सत्ताधार्‍यांचे आमदार होते. त्यातील उपसभापती मायकल लोबो यांचा कळंगुट मतदारसंघ वगळता भाजप, सहकारी पक्ष व अपक्षांच्या मतदारसंघात श्रीपाद नाईक यांना मताधिक्य मिळाले. शिवाय काँग्रेसच्या पर्ये मतदारसंघातही मताधिक्य नोंदले गेले आहे. पराराज्यातील टॅक्सीचालकांना व्यवसायासाठी परवाने दिल्यावरून कळंगुटच्या स्थानिक टॅक्सीचालकांमध्ये रोष होता. प्रचारकाळात त्यांनी श्रीपाद नाईक यांच्याशी त्यावरून वादही घातला होता. तो रोष श्रीपाद नाईकांच्या विरोधात गेल्याचे दिसते. लोबोंच्या या मतदारसंघात काँग्रेसला मताधिक्य मिळाले. हळदोण्यासह (भाजप) शिवोली (गोवा फॉरवर्ड) या मतदारसंघांत भाजपला नाममात्र मताधिक्य मिळाले. काँग्रेसचे आमदार असलेल्या ताळगाव, सांत आंद्रे, सांताक्रूझ या मतदारसंघात काँग्रेसला मताधिक्य मिळाले. पणजी आणि म्हापसा या भाजपच्या दिग्गज दिवंगत नेत्यांच्या मतदारसंघात श्रीपाद यांना मोठे मताधिक्य मिळू शकले नाही. अपक्षांपैकी कला व सांस्कृतिक मंत्री गोविंद गावडे यांच्या प्रियोळ मतदारसंघांत श्रीपाद नाईक यांना नऊ हजारांवर मताधिक्य मिळाले. 

उत्तर गोव्यात खाण प्रश्‍नाची तेवढी झळ भाजपला बसली नाही. असंतोष होता, परंतु तो निवळण्यात विशेषतः मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना यश आले. खाणपट्ट्यात येणार्‍या थिवी वगळता डिचोली, मये, साखळी, पर्ये या मतदारसंघात भाजपला सात ते नऊ हजारांचे मताधिक्य मिळाले. थिवीत तेवढे मताधिक्य अडीच हजाराच्या खाली राहिले. श्रीपाद नाईक यांच्या विरोधात तथाकथित प्रस्थापित विरोधी लाटही दिसली नाही. खाण समस्या, पर्यटक टॅक्सीचालकाचे प्रश्‍न, काँग्रेस आमदाराला भाजपप्रवेश, माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्यासारख्या दिग्गज नेत्यांची नाराजी, पणजी व म्हापशात विधानसभा पोटनिवडणुकीतील उमेदवारीवरून निर्माण झालेली नाराजी असे अडथळे श्रीपाद नाईक यांच्या मार्गात आले. परंतु विजय रोखण्याइतपत हे अडथळे मोठे ठरले नाहीत. भजपचे संघटन, श्रीपाद नाईक यांचा वैयक्‍तिक प्रभाव, त्यांची स्वच्छ प्रतिमा आणि मतदारसंघात असेलला सतत संपर्क व लोकसंग्रह यांच्या जोरावर ते विक्रमी पाचवा विजय नोंदवू शकले.

दक्षिण गोवा मतदारसंघात भाजपचे विद्यमान खासदार अ‍ॅड. नरेंद्र सावईकर मागील यशाची पुनरावृत्ती करू शकतील याबाबत श्रीपाद नाईक यांच्याविषयी तितके खात्रीचे वातावरण नव्हते.  काँग्रेसच्या फ्रान्सिस सार्दिन यांनी त्यांना पुन्हा एकदा पराभूत केले. 2009च्या निवडणुकीत सार्दिन यांनी सावईकरांना 12 हजार मतांच्या फरकाने हरविले होते. यावेळी विजयी मतांचा फरक खाली उतरून 9755 पर्यंत आला.  गेल्या खेपेएवढी मते आणि मताधिक्य मिळविण्यात सावईकरांना अपयश आले. 

दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघात येणार्‍या वीस विधानसभा मतदारसंंघांपैकी भाजप (5) गोवा फॉरवर्ड, अपक्ष आणि मगोप, काँग्रेस सोडून आलेले प्रत्येकी एक अशा नऊ विभागात भाजपचे वर्चस्व होते. प्रत्यक्षात भाजपच्या चार, काँग्रेसच्या तीन, विरोधात गेलेल्या माजी मंत्री सुदिन ढवळीकर यांच्या मडकई आणि भाजपत सामील झालेल्या पूर्वीच्या मगो आमदारांच्या सावर्डे आणि अपक्षाचा सांगे अशा दहा मतदारसंघांत भाजपला मताधिक्य मिळाले. भाजप आमदाराच्या कुठाळी मतदारसंघात आणि सरकारमधील घटक पक्ष असलेल्या गोवा फॉरवर्डच्या फातोर्डा मतदारसंघात भाजप उमेदवाराला आघाडी मिळू शकली नाही. फातोर्डा आणि काँग्रेसकडे असलेल्या मडगाव मतदारसंघात भाजपच्या कार्यकर्त्यांचे प्रबळ संघटन असूनही या ठिकाणी भाजप उमेदवाराला आवश्यक आघाडी मिळू शकली नाही. दक्षिण गोव्यातील खाणपट्ट्यात येणार्‍या सावर्डे (आधीचा मगो) वगळता केपे (काँग्रेस) कुडचडे (भाजप) आणि सांगे (अपक्ष) मतदारसंघात सावईकरांना यावेळी फारशी मतआघाडी मिळाली नाही. केप्यात गेल्यावेळीही सावईकराचे मताधिक्य दोन हजाराच्या आतच होते. सावर्ड्यात तेवढे सावईकरांचे मताधिक्य साडेआठ हजारावर गेले. पण तेही गेल्या खेपेपेक्षा तीनेक हजारांनी कमीच होते. खाणबंदीमुळे उद्भवलेल्या रोषाचा फटका भाजप उमेदावाराला बसलाच. सासष्टी तालुक्यात विधानसभेचे आठ मतदारसंघ येतात. यातील सहा काँगे्रसकडे व प्रत्येकी एक राष्ट्रवादी काँग्रेस व गोवा फॉरवर्डकडे आहेत. ख्रिस्तीबहुल तालुक्यातील आठही मतदारसंघांनी काँग्रेसला हात दिला. या एका तालुक्यात काँग्रेसला मिळालेली पन्नास हजारावर मतांची आघाडी निर्णायक ठरली. दिवंगत मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी मिशन सालसेत कार्यक्रम राबवून ख्रिश्‍चन समुदायाला भाजपला अनुकूल केले होतेे. त्याच्या उपक्रमाची भाजप नेत्यांनी काळजी घेतली नाही. सार्दिन यांना प्रचारासाठी पंचवीसेक दिवसांचा अवधी मिळाला होता.

उमेदवारीसाठी इच्छुक असलेल्या महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष प्रतिमा कुतिन्हो उमेदवारी न मिळाल्याने नाराज होत्या. मागील निवडणुकीत सार्दिन यांनी सहकार्य न केल्याने आमदार आलेक्स रेजिनाल्ड नाराज होते. त्यांच्या नाराजीचा फायदा भाजपला उठविता आला नाही. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे ख्रिस्ती समुदायाचा पर्रीकरांनी जिंकलेला विश्‍वास भाजपच्या विद्यमान धुरीणांना राखता आला नाही. 

महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाने या निवडणुकीत भाजपला असहकार्याची घेतलेली भूमिकाही भाजपला बाधली. मगोपच्या मताची रसद सार्दिन यांना पूरक ठरली. खुद्द सार्दिन यांनीच विजयानंतर त्याची कबुली दिली.