Mon, Nov 30, 2020 13:33होमपेज › Goa › अयोध्या निकालाचे राज्यात स्वागत ः मुख्यमंत्री

अयोध्या निकालाचे राज्यात स्वागत ः मुख्यमंत्री

Last Updated: Nov 10 2019 1:35AM
पणजी ः प्रतिनिधी

सर्वोच्च न्यायालय हे सर्वश्रेष्ठ असून सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या अयोध्येतील रामजन्मभूमी वादावरील आदेशाचे सर्वांनीच स्वागत केले आहे. देशात गेली अनेक वर्षे प्रलंबित असलेल्या अयोध्या वादावरील निकाल सर्वांना मान्य असल्याचे ट्वीट मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी  केले आहे.

राज्यात सर्वधर्मनिरपेक्षतेच्या भावनेने सर्व नागरिक नांदत असून सर्वत्र सलोख्याचे वातावरण पसरलेले आहे. राज्यात सर्वांनीच सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. 
गोवा शांतताप्रिय प्रदेश असला तरी सर्वोच्च न्यायालयाकडून घोषित होणारा अयोध्येच्या राम मंदिराचा विषय नाजूक असून देशबांधवांसाठी महत्वपूर्ण होता. या निकालानंतर राज्याची काळजी घेणे हे सरकारचे कर्तव्य होते. त्यामुळे कुठेही अनुचित प्रकार, वाद, तंटे व अनिष्ट काही घडू नये म्हणून सरकारने आधीच काळजी घेऊन राज्यात 144 कलम लागू केले होते. उत्तर गोवा व दक्षिण गोवा जिल्हा प्रशासनाच्या संकुलात कडक पोलीस बंदोबस्त ठेवला होता. सरकारच्या अपेक्षेनुसार कुठेही अयोध्या निकालानंतर अनिष्ट प्रकार घडले नाहीत, सर्वधर्मीय जनतेने सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचे स्वागत केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी जनतेचे आभार मानले. 

राज्यात शांततेचे वातावरण
गेली अनेक वर्षे प्रलंबित असलेल्या अयोध्येतील रामजन्मभूमी -बाबरी मशीद वादावरील खटल्याचा निकाल अखेर सर्वोच्च न्यायालयाने शनिवारी घोषित केला. या निकालाच्या घोषणेनंतर अनुचित प्रकार व विपरित परिणाम घडण्याची शक्यता असल्याने सरकारने आधीच सावधानता बाळगली होती. राज्यभरात शांतता ठेवण्यासाठी 144 कलम लागू करून पोलीस यंत्रणा सज्ज ठेवली होती. तसेच अतिरिक्त पोलिसांची फौैज तैनात ठेवली होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर राज्यात कुठल्याही प्रकारे निकालाच्या विरोधात प्रतिक्रिया व्यक्त झालेल्या नसून दिवसभर सर्वत्र शांततेचे वातावरण आढळून आले. 

सर्वोच्च न्यायालयाकडून शनिवारी सकाळी 10.30 वाजता अयोध्या प्रकरणी निकालाची घोषणा होणार होती. त्यामुळे सर्वांचे लक्ष याकडे लागून राहिले होते. या निकालाकडे राज्यातील राजकारण्यांचेही बारकाईने लक्ष होते. अयोध्या राम मंदिर वादाचा निकाल ऐकण्यासाठी सर्वांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली होती. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आल्यावर अनेकांनी समधान व्यक्त केले. 

सरकारी कार्यालये व बँकांना शनिवारी सुट्टी असल्याने पणजी शहरात लोकांच्या गर्दीचे प्रमाण थोडे कमी होते. तरी इतर खासगी आस्थापने, हॉटेल व्यवसाय, प्रवासी बसेस, वाहतूक, पर्यटन व अन्य व्यवहारही सुरळीतपणे चालू होते. अयोध्येच्या ऐतिहासिक निकालानंतर सरकार पक्षाचे नेते, विरोधक व समाजातील विविध घटक, प्रतिष्ठितांनी समाधान व्यक्त करून निकालाबद्दल अनुकूल प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.