होमपेज › Goa › महिलांना रात्रपाळीत कामास आयटकचा विरोध

महिलांना रात्रपाळीत कामास आयटकचा विरोध

Published On: Jul 02 2019 2:01AM | Last Updated: Jul 01 2019 11:47PM
पणजी : प्रतिनिधी

कारखाना व बाष्पक कायद्यात दुरुस्ती करून महिलांना रात्रपाळीत काम करण्याची मुभा देण्याच्या सरकारच्या निर्णयाला तीव्र विरोध असल्याचे आयटकचे सरचिटणीस ख्रिस्तोफर फोन्सेका यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. या निर्णयामुळे रात्रपाळीत महिला कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्‍नदेखील ऐरणीवर येऊ शकतो, अशी चिंता त्यांनी व्यक्‍त केली.

फोन्सेका म्हणाले, कारखाना व बाष्पक कायद्यात दुरुस्तीचा विषय हा केंद्र सरकारच्या अखत्यारित येतो. गोवा सरकार या कायद्यात दुरुस्ती करु शकत नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
नुकत्याच झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत कारखाना व बाष्पक कायद्यात दुरुस्ती करून महिलांना रात्रपाळीत काम करण्यास मुभा देण्याचा निर्णय झाला आहे. संध्याकाळी 7 ते सकाळी 6 अशी कामाची वेळ नमूद करण्यात आली आहे. प्रत्यक्षात सरकारचा हा निर्णय कामगारांच्या फायद्यासाठी नव्हे तर तो भांडवलदार, उद्योजकांच्या फायद्यासाठी घेण्यात आला असल्याचा आरोप फोन्सेका यांनी केला.

सरकार केवळ भांडवलदारांचे आहे. त्यांनी केलेली कायद्यात दुरुस्ती बेकायदेशीर असून जर त्याला कुणी न्यायालयात आव्हान दिले तर हा निर्णय टिकणार नाही. कामगारांना या निर्णयाचा फायदा होणार नाही. झालाच तर त्याचा त्रास होईल. रात्रपाळीत काम करणार्‍या महिला कामगारांची वाहतुकीची सोय, पगारवाढ, सुरक्षा याबाबत कोणती व्यवस्था करण्यात आली आहे, असा प्रश्‍न फोेन्सेका यांनी उपस्थित केला.

एखाद्या महिला कामगाराने रात्रपाळीत काम करण्यास नकार दिल्यास कायद्याकडे बोट दाखवून तिला कामावरुनदेखील कमी केले जाऊ शकते. सरकारने हा निर्णय घेताना कामगार तसेच संबंधित घटकांना विश्‍वासात घेतलेले नाही. त्यामुळे या निर्णयाला आयटकचा तीव्र विरोध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

राज्यात सध्या गोवा टॅक्सी माईल्स अ‍ॅपचा मुद्दा गाजत आहे.टुरिस्ट टॅक्सी चालकांकडून त्याला विरोध केला जात आहे. सरकारने या प्रश्‍नी सामंजस्याने तोडगा काढावा. त्याचबरोबर टॅक्सींना समान भाडे लागू करावे, अशी मागणी त्यांनी केली. आयटकचे नेते अ‍ॅड. सुहास नाईक व अ‍ॅड. राजू मंगेशकर उपस्थित होते.

‘खाण कर्मचार्‍यांच्या बदलीचे सत्र थांबवावे’

राज्यातील खाण कंपन्यांनी आपल्या कर्मचार्‍यांची गोव्याबाहेर बदली करण्याचे सत्र सुरू केले असल्याचा आरोप आयटकचे सरचिटणीस ख्रिस्तोफर फोन्सेका यांनी केला. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी याप्रश्‍नी त्वरीत लक्ष द्यावे व खाण कंपन्यांना तसे न करण्याचे निर्देश द्यावेत. त्याचबरोबर काही खाण कंपन्या कर्मचार्‍यांवर सेवानिवृत्ती घेण्यास जबरदस्ती करीत आहेत, असेही ते म्हणाले.

‘बीएसएनएल कंत्राटी कामगारांचा थकीत पगार द्या’ 

 बीएसएनएलच्या कंत्राटी कामगारांना मागील सहा महिन्यांपासून पगार देण्यात आलेला नाही. त्यामुळे त्यांच्या समोर यक्ष प्रश्‍न उभा राहिला असून त्यांचा पगार त्वरित दिला जावा, अशी मागणी फोन्सेका यांनी केली. बीएसएनएल सध्या बंद पडण्याच्या मार्गावर असल्याची चिन्हे दिसत आहेत. सरकारने या प्रश्‍नी त्वरित हस्तक्षेप करावा. बीएसएनएल बंद होणार नाही याकडे लक्ष द्यावे, अशी मागणीही त्यांनी केली.