Mon, Sep 21, 2020 05:18होमपेज › Goa › दोन उपमुख्यमंत्र्यांची नियुक्‍ती  हे आचारसंहितेचे उल्लंघन

दोन उपमुख्यमंत्र्यांची नियुक्‍ती हे आचारसंहितेचे उल्लंघन

Published On: Mar 24 2019 1:17AM | Last Updated: Mar 24 2019 1:17AM
पणजी : प्रतिनिधी

राज्यात दोन उपमुख्यमंत्र्यांची नियुक्‍ती करणे हे सध्या लागू असलेल्या निवडणूक आचारसंहितेचे उल्‍लंघन ठरत असून या नियुक्त्यांच्या विरोधात निवडणूक आयोगाकडे काँग्रेस पक्षातर्फे तक्रार करण्यात आली असल्याची माहिती पक्षाचे प्रवक्‍ते ट्रोजन डिमेलो यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

दोन उपमुख्यमंत्र्यांची नेमणूक करणे म्हणजे मतदारांना भुलवण्याचा प्रकार आहे. निवडणूक आयोगाने याची गंभीर दखल घ्यावी, अशी मागणीही त्यांनी केली.डिमेलो म्हणाले, राज्यात लोकसभा तसेच पोटनिवडणुकीची आचारसंहिता लागू झालेली आहे. मात्र, सरकारकडून या आचारसंहितेचे पालन केले जात नाही. तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या निधनानंतर नव्या मुख्यमंत्र्याचा तसेच दोन उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी पार पडला. त्यानंतर गोवा सरकारच्या सर्वसाधारण प्रशासन खात्याने या दोन उपमुख्यमंत्र्यांच्या नियुक्‍तीचा आदेश जारी केला. आचारसंहिता लागू झाल्यानंतर अशा प्रकारे प्रशासकीय आदेश जारी करणे  बेकायदेशीरच नव्हे तर आचारसंहितेचे उल्‍लंघन ठरते, असे त्यांनी सांगितले.

सर्वसाधारण प्रशासन खात्याच्या अवर सचिवांनी हा उपमुख्यमंत्री नियुक्‍तीचा  प्रशासकीय आदेश  जारी केला. मुख्य  निवडणूक अधिकार्‍यांनी याची गंभीर दखल घ्यावी व हा आदेश त्वरित रद्द करावा, अशी मागणी निवडणूक आयोगाकडे करण्यात आलेल्या तक्रारीत केली असल्याचे डिमेलो यांनी सांगितले.

प्रदेश काँग्रेसचे प्रवक्‍ते अ‍ॅड. रोहीत ब्रासडिसा म्हणाले, आचारसंहितेचा उद्देश निवडणुका पारदर्शक होणे हा आहे. आचारसंहितेच्या काळात कुठलेच प्रशासकीय निर्णय घेतले जावू शकत नाहीत. सर्वसाधारण प्रशासन खात्याने दोन उपमुख्यमंत्र्यांच्या नियुक्‍तीचा आदेश जारी केला. सदर आदेश जारी करण्याची इतकी घाई का, असा सवालही त्यांनी केला.

सदर निर्णय हा केवळ मतदारांना भूलवण्याचा प्रयत्न आहे. निवडणूक आयोगाने या प्रकरणी कारवाई न केल्यास  त्यांचीदेखील त्याला संमती असल्याचे स्पष्ट होईल. या प्रकरणी निवडणूक आयोगाने त्वरित कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी  केली.