Sun, Aug 09, 2020 06:03



होमपेज › Goa › अन्वर शेख खून; चौघांना अटक

अन्वर शेख खून; चौघांना अटक

Last Updated: Dec 29 2019 1:45AM




मडगाव : प्रतिनिधी

अन्वर शेख ऊर्फ चोर अन्वर याचा शुक्रवारी रात्री उशिरा जबर मारहाण करून खून केल्याप्रकरणी अवघ्या 24 तासांत चार संशयितांना गजाआड करण्यात दक्षिण गोवा पोलिसांना यश आले. नागराज नाइकर (वय 26), जगेश मेठी (29), सदाशिव काद्दी (28) व बसवराज काद्दी (34) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत.

मृत अन्वर तसेच चारही संशयित मोतीडोंगर येथील रहिवासी आहेत. संशयितांना रविवारी न्यायालयात उभे केले जाणार आहे. संशयित नागराज नाइकर याला खुनाच्या घटनेनंतर लगेच अटक करण्यात आली होती. जगेश व सदाशिव यांना फोंडा येथून पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना अटक करण्यात आली. संशयित बसवराज याला शनिवारी दुपारी मडगाव परिसरात अटक करण्यात आली. 

दक्षिण गोवा पोलिस अधीक्षक अरविंद गावस यांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री नऊच्या सुमारास खुनाचा सदर प्रकार घडला. शुक्रवारी संध्याकाळी सातच्या सुमारास अन्वर आणि जगेश मेठी याचा मडगाव येथील रेल्वेस्थानक परिसरात क्षुल्लक कारणावरून वाद झाला होता. यावेळी अन्वर याने रागाच्या भरात जगेश याच्या चेहर्‍यावर बीअर फेकली. जगेश हा बदल्याच्या भावनेने मोतीडोंगर येथील घरी आला आणि त्याने आपले चुलत भाऊ सदाशिव आणि बसवराज काद्दी यांना घडलेल्या घटनेची माहिती दिली. जगेश याचा मित्र नागराज यालाही घटनेची माहिती देण्यात आली. यानंतर बदला घेण्याच्या भावनेने चारही संशयित अन्वर याच्या घराशेजारी दबा धरून बसले. रात्री नऊच्या सुमारास अन्वर घरी यायला निघाला तेव्हा चारही संशयितांनी अडवून त्याला जबर मारहाण केली. फुटलेल्या बेजिनचा भाग, कोयता, नारळाच्या झाडाचे खोड, दगड, बेसबॉल बॅट आदी साधने घेऊन संशयितांनी अन्वरला जीव जाईपर्यंत मारहाण केली. यावेळी संतोष मधे अडविण्यासाठी गेला असता संशयितांनी त्यालाही बॅटने मारहाण केली. कोयत्याने वार केल्याने अन्वर जागीच गतप्राण झाला. संशयितांनी हल्ला करून अन्वरला रक्ताच्या थारोळ्यात सोडून घटनास्थळाहून धूम ठोकली. रात्री उशिरा संतोष च्यारी यांनी मडगाव पोलिस स्थानकावर खून झाल्याची तक्रार नोंद केल्यावर सदर प्रकार उघडकीस आला. 

पोलिसांनी मृत अन्वर शेख याची शुटर म्हणून नोंद केली होती. त्याच्यावर मडगावसह दक्षिण गोव्यातील विविध पोलिस स्थानकांत गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. दक्षिण गोवा दंडाधिकारी कार्यालयात अन्वरच्या तडिपारीची प्रक्रियाही सुरू आहे. सदर खुनाचा तपास करण्यासाठी दक्षिण गोवा पोलिस उपअधीक्षक सेरफिन डायस यांच्या नेतृत्वाखाली दक्षिण गोव्यातील पोलिस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली तुकड्या करण्यात आल्या होत्या. पोलिसांच्या अथक प्रयत्नांमुळे अवघ्या 24 तासांत चारही संशयितांना गजाआड करण्यात पोलिसांना यश आले.

तपास पथकामध्ये मडगाव पोलिस निरीक्षक सचिन नार्वेकर, मायणा कुडतरीचे पोलिस निरीक्षक गुरुदास कदम, फातोर्डा पोलिस निरीक्षक कपिल नायक, कोलवा पोलिस निरीक्षक मेल्सन कुलासो, केपेचे पोलिस निरीक्षक संतोष देसाई, कुडचडेचे पोलिस निरीक्षक रवी देसाई, पोलिस उपनिरीक्षक प्रशल देसाई, सागर धाटकर, नवीन देसाई, सहाय्यक पोलिस निरीक्षक मधुकर राणे, सुभाष नाईक, हेड कॉन्स्टेबल समीर नागनुरी, पोलिस कॉन्स्टेबल गोरखनाथ गावस, अविनाश नाईक, रिजवान शेख, विजयकुमार कामाथान व अन्य पोलिसांचा समावेश आहे.