Sat, Aug 08, 2020 13:53



होमपेज › Goa › मासळी तपासणीसाठी 24 तासात एजन्सी

मासळी तपासणीसाठी 24 तासात एजन्सी

Published On: Oct 09 2018 1:19AM | Last Updated: Oct 10 2018 1:26AM



मडगाव : प्रतिनिधी 

फॉर्मेलिनबाबत जनतेच्या मनात मासळीविषयी निर्माण झालेली भीती दूर करण्यासाठी आयात मासळीच्या तपासणीसाठी येत्या 24 तासात आंतरराष्ट्रीय एजन्सीची नियुक्ती केली जाईल, नोंदणी नसलेल्या मासळी व्यावसायिकांवर 15 ऑक्टोबरनंतर बंदी घातली जाईल, अशी माहिती आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे आणि नगरनियोजनमंत्री विजय सरदेसाई यांनी सोमवारी येथे संयुक्तरीत्या घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली. फार्मेलिनवरून काँग्रेस पक्ष लोकांना भडकावून स्वतःची राजकीय पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न करीत आहे, अशी टीकाही त्यांनी केली.

नगरनियोजनमंत्री विजय सरदेसाई, आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे आणि जलस्रोतमंत्री विनोद पालयेकर यांच्यासह राज्याचे मुख्य सचिव धर्मेंद्र शर्मा, अन्न आणि औषध प्रशासनाच्या संचालिका ज्योती सरदेसाई, जिल्हाधिकारी डॉ. तारिक थॉमस, मडगाव पालिका मुख्याधिकारी सिद्धिविनायक नाईक व इतर अधिकार्‍यांचा समावेश असलेल्या  उच्चस्तरीय समितीची बैठक   जिल्हाधिकारी संकुलात सोमवारी पार पडली. फॉर्मेलिनच्या मुद्द्यामुळे निर्माण झालेल्या गोंधळाबाबत या बैठकीत चर्चा झाली. बैठकीनंतर तिन्ही मंत्र्यांनी पत्रकार परिषद घेऊन बैठकीत  झालेल्या निर्णयांची माहिती  दिली.

मासळी हे गोमंतकीयांच्या ताटातील प्रमुख अन्न आहे. त्यामुळे पूर्वीप्रमाणे लोकांचा मासळीवर विश्‍वास  कायम राहावा, यासाठी  आयात मासळीच्या तपासणीसाठी एखाद्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील संस्थेची निवड करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला, अशी माहिती आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे यांनी दिली. येत्या 24  तासात तशा संस्थेची नियुक्ती केली जाईल,मात्र अद्याप कोणत्याही संस्थेशी चर्चा झालेली नाही, असेही त्यांनी सांगितले.

मासळीत फॉर्मेलिन असल्याची भीती अजून लोकांच्या मनात घर करून आहे. ती दूर करून पुन्हा विश्‍वास प्रस्थापित करण्यासाठी मासळी तपासणीसाठी तातडीने सक्षम संस्थेची निवड केली जाणार असून त्यांना एफडीएसोबत गोव्यात काम करण्यासाठी निमंत्रित केले जाणार आहे. या निवडीपूर्वी फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड ऑथोरिटी ऑफ इंडिया(एफएसएसएआय) कडून सल्ला घेतला जाणार आहे,अशी माहिती आरोग्यमंत्री राणे यांनी दिली.

सरदेसाई म्हणाले की, मासळी हे गोव्यातील लोकांचे मुख्य अन्न असून त्यांनी ते खाताना मनात शंका बाळगू नये.  योग्य व चांगले अन्न  लोकांपर्यंत पोचविण्यासाठी सरकारने ही पावले उचललेली आहेत.लोकांच्या आरोग्याला हानिकारक असा एकही खाद्यपदार्थ त्यांच्यापर्यंत पोहचवला जाणार नाही.  विरोधी पक्ष फॉर्मेलिन चा मुद्दा राजकारणात आणून लोकांच्या मनात शंका वाढवत आहे. मात्र त्यासंदर्भात मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्याशी आपली चर्चा झाली असून  आम्ही योग्य ती पावले उचलून  लोकांचा विश्‍वास कायम राखू.