Sun, Aug 09, 2020 04:18होमपेज › Goa › बंदी झुगारून ‘दूधसागर’वर पर्यटकांना पाठवणारी टोळी सक्रिय

बंदी झुगारून ‘दूधसागर’वर पर्यटकांना पाठवणारी टोळी सक्रिय

Published On: Jun 19 2018 1:32AM | Last Updated: Jun 19 2018 1:14AMमडगाव : विशाल नाईक

बंदी असूनही हजारो रुपये घेऊन बेकायदेशीरपणे कोणत्याही सुरक्षेशिवाय पर्यटकांना दूधसागर धबधब्याजवळ पाठवणारी टोळी कुळेत यंदाही वर्षी सक्रिय झाली आहे. कुळेत गेल्या अनेक वर्षांपासून या टोळीकडून पर्यटकांना रेल्वेतून दूधसागर धबधब्यावर पाठवून नंतर त्यांना मालगाडीच्या डब्यात बसवून माघारी आणले जात आहे. 

दूधसागर नदीच्या पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने वन खात्याने खबरदारीचा उपाय म्हणून कुळे येथून पर्यटकांना दूधसागर धबधब्याजवळून ने आण करणार्‍या स्थानिक लोकांच्या जीप गाड्यांवर  31 मे रोजी बंदी आणल्याने आणखी महिनाभर चालणारा जीप, दुचाकींचा व्यवसाय बंद पडला आहे.मात्र बेकायदेशीरपणे पर्यटकांना धबधब्याजवळ पाठवणार्‍यांमुळे पर्यटकांच्या जीविताचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. 

अब्दुल,ओरिसा अशी टोपण नावे  असलेल्या सुमारे दहा जणांची एक टोळी असून त्यांच्याकडून  पर्यटकांना रेल्वेत बसवून दूधसागरावर पाठवले जात आहे.तेलंगणातून आलेल्या पर्यटकांशी चर्चा केली असता रोहन सुदर्शन या युवकाने ही माहिती दिली. ओरिसा नावाच्या व्यक्तीने त्यांच्याकडून प्रत्येकी एक हजार रुपये घेऊन कुळे रेल्वे स्थानकावर एका रेल्वे पोलिसाच्या ताब्यात देण्यात आले .त्या पोलिसाने त्यांना गोवा एक्स्प्रेस मध्ये बसवून थेट दूधसागर धबधब्या जवळ असलेल्या रेल्वे स्थानकावर उतरवले.सुमारे चार तास तिथे व्यतीत केल्या नंतर हे सर्व वीसही युवक मालगाडीत बसून परत कुळेत आले,अशी माहिती सुदर्शन याने दिली.

कुळेत काही लोकांशी संपर्क साधला असता दर वर्षी पावसात हा प्रकार सुरु असतो ,असे त्यांनी सांगितले.ही टोळी पर्यटकांना हेरून त्यांच्याकडून हजारो रुपये घेते त्यापैकी कोणीच त्या पर्यटकांसोबत दूधसागरावर जात नाही.पर्यटकांना दूधसागर धबधबा अनोळखी आहे,त्यामुळे मद्यपान करून सेल्फी घेताना अतिउत्साही पर्यटकांच्या बाबतीत कोणतीही अनुचित घटना घडू शकते,अशी भीती स्थानिकांनी व्यक्त केली.

तेलंगणा येथील पर्यटकांनी दूधसागराच्या धोकादायक कठड्यावर बसून फोटो काढल्याचे ‘पुढारी’शी बोलताना दाखविले.या पर्यटकांना कोणतीही सुरक्षा प्राप्त करून दिली जात नाही.अनेकदा महिला आणि लहान मुले सुद्धा या बोगस गाईडच्या भरवश्यावर जीव धोक्यात घालून दूधसागरावर जातात, तसेच काही वेळा रात्र त्याच ठिकाणी काढली जाते.रात्रीच्या वेळी जंगली जनावरांचा आणि खास करून गव्या रेड्यांचा इथे जास्त वास असतो.पण याची कोणतीही माहिती पर्यटकांना दिली जात नाही.आरक्षण नसतांना पर्यटकांना दूधसागरावर नेऊन कसे उतरवले जाते व बेकायदेशीर पणे त्यांना पुन्हा मालगाडीच्या शेवटच्या डब्यात बसवून कसे आणले जाते याची चौकशी करण्याची मागणी कुळे येथील जागृत रहिवाशांनी केली आहे.परप्रांतीय पर्यटकांचा जीव जाण्याच्या अनेक घटना गोव्यात घडलेल्या आहेत. पण दूधसागराच्या बाबतीत वनखाते सौम्य भूमिका घेत असल्याची टीका होत आहे.

कुळेचे सरपंच मनिष  लांबोर यांनी  सांगितले,की वन खात्याच्या धोरणामुळे कुळेचे स्थानिक लोक उत्पन्नाला मुकले असून तिथे परप्रांतीयांना सूट दिली जात  आहे.दरवर्षी पावसात पर्यटकांना दूधसागर दर्शन घडविण्याचे काम सुमारे चारशे स्थानिक दुचाकीस्वार युवकांना मिळत असते.त्यावरून त्यांचे पोट चालते.शिवाय दुचाकीवरून जाणार्‍या पर्यटकांना पंचायत सुरक्षा जॅकेट पुरवत असल्याने पंचायतीला उत्पन्न प्राप्त होते.यंदा वनखात्याने दुचाकीस्वारांवर पूर्णपणे बंदी घातली आहे.त्यामुळे वरील प्रकारांत वाढ झाली आहे असे लंबोर म्हणाले.पर्यटकांना सुरक्षा मिळणे गरजेचे आहे.त्यांच बरोबर सरकारने स्थानिक लोकांच्या पोटापाण्याचा विचार करण्याची आवश्यकता आहे. खाणी बंद झाल्याने पर्यायी रोजगार निर्माण होणे गरजेचे आहे.मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्याशी चर्चा करण्यात आली असून ते यावर काहीतरी मार्ग काढतील, अशी खात्री त्यांनी व्यक्त केली आहे.
दक्षिण-पश्‍चिम रेल्वेच्या हुबळी विभागाने  प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकातून कॅसलरॉक ते कुळे घाट या भागात वाघ आणि बिबट्यांचा संचार आढळून आला असून  लोकांनी या परिसरात फिरताना दक्षता बाळगावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

पर्यटकांच्या अज्ञानाचा फायदा

एरवी वर्षभर दूधसागर धबधबा देशी आणि विदेशी पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरतो.उन्हाळ्यात पर्यटकांबरोबर ट्रेकिंग करणार्‍यांसाठी दूधसागर वरदान ठरतोे.पण पावसाळ्यात मात्र दूधसागर रौद्ररूप धारण करत असल्याने कुळेतून नदी ओलांडून दूधसागर धबधब्यावर जाणे जीवावर बेतणारे असते. त्यामुळे वनपाल परेश परोब यांनी   पर्यटकांना दूधसागर धबधब्यावर घेऊन जाणार्‍या स्थानिकांच्या जीप,दुचाकींवर बंदी आणली होती.  पर्यटकांना या बंदीबद्दल माहिती नसल्याने दररोज शेकडो  पर्यटक कर्नाटकातून थेट मोलेत उतरल्यानंतर कुळेत दाखल होताहेत.पण तेथे  त्यांना दूधसागरावर जाण्यास बंदी असल्याचे समजताच त्यांची निराशा होत आहे.याचा फायदा कुळेत सक्रिय झालेली टोळी घेत आहे.

बोगस एजंटांकडून  रेल्वेमार्गाचा पर्याय 

दूधसागर धबधब्याचे दर्शन घडवण्याच्या नावाखाली वनक्षेत्रातून पर्यटकांना नेऊन त्यांचा जीव धोक्यात घालणार्‍या दोघा बोगस एजंटस्ना पकडून आम्ही त्यांच्यावर कारवाई केली होती,  असे  वनपाल परेश परोब यांनी सांगितले. ते म्हणाले, आता वनक्षेत्रातील रस्ता सोडून बोगस एजंटांनी रेल्वे मार्गाच्या पर्यायाचा वापर करणे सुरू केले आहे.रेल्वे मार्ग केंद्र सरकारच्या अखत्यारित येत असल्याने आम्ही त्यात हस्तक्षेप करू शकत नाही. धबधब्यावर पर्यटकांना काही झाल्यास त्याचा परिणाम इतर व्यवसायावर होऊ शकतो. त्यामुळे सर्वांनी एकत्र येऊन यावर मार्ग काढण्याची आवश्यकता आहे,असेही परोब  म्हणाले.

रेल्वे पोलिसांशी  हातमिळवणी 

रेल्वे पोलिसांना हाताशी धरल्याशिवाय बोगस एजंटांची टोळी पर्यटकांना रेल्वेतून धोकादायकरित्या धबधब्यापर्यंत पाठवणे  शक्य नाही, असे काही स्थानिकांनी प्रतिनिधीशी बोलताना संगितले.