Thu, Oct 29, 2020 08:18होमपेज › Goa › ‘दाबोळी’वर 57 लाखांचे सोने जप्त;भटकळच्या प्रवाशाला अटक

‘दाबोळी’वर 57 लाखांचे सोने जप्त;भटकळच्या प्रवाशाला अटक

Last Updated: Mar 19 2020 12:59AM
वास्को : पुृढारी वृत्तसेवा

येथील दाबोळी विमानतळावर मंगळवारी पहाटे दुबईहून आलेल्या मोहम्मद आयुब(रा.भटकळ,कर्नाटक) या आंतरराष्ट्रीय प्रवाशाकडून गोवा कस्टम्स विभागाच्या अधिकार्‍यांनी सुमारे 57.67 लाख रुपये किमतीची बिस्किटे जप्त केली.   कस्टम्स अधिकार्‍यांनी 15 मार्चला दाबोळी विमानतळावर उतरलेल्या एअर इंडियाच्या विमानाच्या  स्वच्छतागृहात बेवारस स्थितीत असलेली एक कोटी 11 लाखांहून अधिक किंमतीची तीन सोन्याची बिस्किटे जप्त केली होती. कस्टम्स गोवा विभागाने मार्च 2019-2020  या वर्षात आतापर्यंत 3.43 कोटीचे तस्करीचे सोने जप्त केले आहे. 

येथील दाबोळी विमानतळावर येणार्‍या आंतरराष्ट्रीय प्रवाशांच्या सामानाची तपासणी करण्यात येते. तसेच विमानाच्या आतील भागात जाऊन कस्टम्स अधिकारी संपूर्ण विमानाची तपासणी करतात. सदर तपासणी हा नियमित कामाचा एक भाग असतो. मंगळवारी पहाटे दुबई- मस्कत गोवा हे ओमान एअरचे डब्ल्यू वाय 0209 क्रमांकाचे विमान दाबोळी विमानतळावर उतरले होते. या विमानातून उतरलेल्या प्रवाशांच्या सामानाची नेहमीप्रमाणे तपासणी करण्यात येत होती.

यावेळी  आयुब याच्या चेक इन बॅगेजमध्ये सोन्याची बिस्किटे लपवून ठेवण्यात आल्याचे  निदर्शनास आले. त्या बॅगेची तपासणी करण्यात आली तेव्हा त्यामध्ये प्रत्येकी 10 तोळ्याची  तेरा व लहान आकारचे अशी एकूण चौदा सोन्याची बिस्किटे मिळाली.  सदर सोन्याच्या बिस्किटांचे वजन 1538 ग्रँम भरले. या बिस्किटांची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत 57.67 लाख होते. सदर सोने कस्टम्स कायदा 1962 नुसार जप्त करण्यात आले. याप्रकरणी आयुबची चौकशी करण्यात येत आहे. 

सदर कारवाई गोवा विभागाचे आयुक्त मिहिर रंजन यांच्या मार्गदर्शनाखाली व सहाय्यक आयुक्त वाय. बी. सहारे व सहाय्यक आयुक्त श्रीमती ज्युलिएट यांच्या नेतृत्वाखाली व  संयुक्त आयुक्त  प्रज्ञशील जुमले यांच्या देखरेखीखाली करण्यात आली. 
 

 "