Sun, Sep 20, 2020 10:50होमपेज › Goa › कोकण रेल्वेचे 50 टक्के आरक्षण रद्द

कोकण रेल्वेचे 50 टक्के आरक्षण रद्द

Last Updated: Mar 19 2020 12:59AM
मडगाव : पुढारी वृत्तसेवा

जगात थैमान माजविलेल्या कोरोना व्हायरसमुळे सध्या सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले असून या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वेचे सुमारे 50 टक्के आसन  आरक्षण रद्द करण्यात आले आहे. कोरोना हा संसर्गजन्य आजार असल्याने कोकण रेल्वे स्थानकावरही प्रवेशद्वारावर ‘हँड स्कॅ नर’बसविण्यात आले असून बुधवारपासून हे स्कॅ नर कार्यान्वित करण्यात आलेले आहेत.

कोरोनावर मात करण्यासाठी मडगाव कोकण रेल्वेनेही कोरोनाच्या संशयित रुग्णांसाठी रेल्वेच्या कम्युनिटी सभागृहात दहा खाटांचा   आयसोलेशन वॉर्ड तयार केला आहे. हँड स्कॅ नरद्वारे तपासणी करण्यात येणार्‍या प्रवाशांपैकी एखादा संशयित रूग्ण सापडल्यास त्यांना  या  वॉर्डमध्ये दाखल करण्यात येणार आहे. आवश्यक चाचण्यांतून  संशयित रूग्ण  कोरोनाबाधित असल्याचे आढळल्यास त्यांना गोमेकॉत पाठविण्यात येणार आहे, अशी माहिती कोंकण रेल्वेचे ज्येष्ठ जनसंपर्क अधिकारी बबन घाटगे यांनी दिली. 

मडगाव कोकण रेल्वे स्थानकावरून बाहेर पडता येईल,अशा सर्व वाटा बंद  करण्यात आलेल्या असून फक्त मुख्य प्रवेशद्वार खुले ठेवण्यात आलेले आहे. याच प्रवेशद्वारावर दोन ठिकाणी हँड स्कॅ नर बसविण्यात आलेले आहेत. एखाद्या प्रवाशाचे तापमान 90 अंशाहून जास्त झाल्याचे आढळल्यास त्याला कोरोनाची बाधा  होण्याची  शक्यता अधिक असते,असेही बबन घाटगे यांनी  सांगितले.

रेल्वे मंत्रालयाकडून आलेल्या आदेशानुसार रेल्वे एसी डब्यातील पडदे व संबंधित अन्य गोष्टी जंतुनाशकाद्वारे स्वच्छ करण्यात आलेल्या आहेत. प्रवाशांना चादरी देणे थांबवण्यात आलेले असून प्रवाशांनी या दिवसांत आवश्यकता असल्यास  स्वतः आपली चादर घेऊन प्रवास करावा, असे आवाहन करण्यात आलेले आहे ,असे  घाटगे यांनी सांगितले. रेल्वेचे टिसी, कारकून आदी कर्मचार्‍यांना मास्क व सॅनिटायझर देण्यात आलेले आहेत. कोरोनाची बाधा होऊ नये यासाठी रेल्वे स्थानकावर     काय करावेे व काय करू नये,याची  माहिती देणारी पत्रके  सर्वत्र लावण्यात आलेली असून तिकिट काउंटर, रिजर्वेशन काऊंटरही स्वच्छ करण्यात आलेला आहे, असेही त्यांनी सांगितले.

 कोकण रेल्वेने10722 हा हेल्पलाईन क्रमांक कार्यान्वित केलेला असून एखाद्या रेल्वे प्रवाशाला प्रवासात कोरोनाची लक्षणे जाणवल्यास त्वरीत मदतीसाठी प्रवाशांनी हेल्पलाईनवर कॉल करावा. त्यानंतर संशयित रुग्णांना त्वरित  मदत उपलब्ध करण्यात येणार आहे.
- बबन घाटगे, कोकण रेल्वेचे  जनसंपर्क अधिकारी


 

 "