Thu, Oct 01, 2020 03:38होमपेज › Goa › नव्या छोट्या उद्योगांसाठी 50 टक्के निधी देणार : मुख्यमंत्री प्रमोद सावंत

नव्या छोट्या उद्योगांसाठी 50 टक्के निधी देणार

Last Updated: Feb 16 2020 1:47AM

मुख्यमंत्री प्रमोद सावंतपणजी : पुढारी वृत्तसेवा

गोव्यात नवीन उद्योग सुरू करण्यासाठी जमिनीची कमतरता भासत आहे. तरी सरकार लघु उद्योगाला चालना देण्यासाठी उत्सुक असून लवकरच विशेष आर्थिक विभागाच्या जमिनीत छोटे (मायक्रो ) उद्योग सुरु केले जाणार आहेत. राज्यात नवीन छोटे उद्योग सुरू करणार्‍यांना सरकारकडून 50 टक्के निधीचा पुरवठा केला जाईल , असे आश्वासन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिले.

भारतीय लघु उद्योग महासंघ व लघु उद्योग संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने येथे  शनिवारी देशातील लघु उद्योग क्षेत्रातील आव्हाने व संधी याबद्दलच्या राष्ट्रीय परिषदेचे आयोजन केले होते. त्या परिषदेचे औपचारिक उदघाटन केल्यानंतर प्रमुख पाहुणे म्हणून मुख्यमंत्री  बोलत होते. यावेळी केंद्रीय रस्ता व द्रुतगती महामार्ग मंत्री व्ही. के. सिंग, दक्षिण गोव्याचे खासदार फ्रान्सिस्को सार्दिन, भारतीय लघु उद्योग महासंघाचे अध्यक्ष उदय चंद्रन, सी. ए. जनार्दन, एस. बाबू, शेखर राजू, विश्वनाथ कोचकर, स्मृती मस्तानी व मृणालिनी सिंग व्यासपीठावर उपस्थित होत्या. 

मुख्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले,की गोव्याने खरं म्हणजे गेल्या दोन-अडीच दशकांत औद्योगिक क्षेत्रात भरीव प्रगती केली असून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर मोठ्या उद्योजकांनी बरीच गुंतवणूक केलेली आहे. त्या सर्वांचे उद्योग भरभराटीला आलेले आहेत. केंद्र सरकारकडून नवीन उद्योग सुरू करण्यासाठी आर्थिक स्वरुपात सवलती दिल्या जात आहेत. तसेच केंद्र सरकारने लघु उद्योजकांना 20 टक्क्यांवरून 15 टक्के कर लागू करून त्यांच्या करात 5 टक्के कपात केली आहे. सरकारकडून मिळणार्‍या सुविधांचा उद्योजकांनी लाभ घ्यावा.

देशात छोटे उद्योग हे मोठे क्षेत्र आहे. या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात रोजगाराची निर्मिती होते. तसेच छोट्या  उद्योगाच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात उलाढाल होते. छोट्या उद्योगासाठी वेगळ्या प्रकारे आर्थिक सहकार्य करून सलवती व सुविधा देण्याबरोबर खास योजना तयार करण्याचा केंद्र सरकार प्रयत्न करीत आहेत. या क्षेत्रातील छोट्या उद्योजकांना बँकाकडून कमी व्याज दराने कर्जे देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय रिझर्व्ह बँकेकडे बोलणी केली आहेत. केंद्र सरकारची ही योजना मार्गी लागल्यानंतर उद्योजकांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार, असे डॉ. सावंत यांनी सांगितले.

भारतीय लघु उद्योग महासंघाचे अध्यक्ष उदय चंद्रन यांनी स्वागत करून सांगितले ,की देशभरात छोट्या उद्योगांची भरीव प्रगती झालेली असून आतापर्यंत 60 दशलक्ष नोकर्‍यांची निर्मिती झालेली आहे. तसेच केंद्र सरकारने लघु उद्योजकांसाठी चांगले राष्ट्रीय धोरण अवलंबलेले आहे. लघु उद्योजकांना स्वस्त व्याजाने कर्जे दिली जात असल्यामुळे उद्योगाची प्रगती होत आहे. गोव्यातही लघु उद्योगाला मोठी संधी आहे.

केंद्रीय रस्ता व द्रुतगती महामार्गमंत्री व्ही.के. सिंग, दक्षिण गोव्याचे खासदार फ्रान्सिस सार्दिन, मृणालिनी सिंग, स्मृती मस्तानी यांची मार्गदर्शनपर भाषणे झाली. यावेळी लघु उद्योग क्षेत्रातील नरसिंह पुजारी (गोवा), एस. बाबू (बंगळूर), नवीन चंद्र (केरळ) व बी. जी. पाटील (गुलबर्गा) यांचा मुख्यमंत्र्याच्या हस्ते मानचिन्हे देऊन सत्कार करण्यात आला.  

 "