Thu, Oct 01, 2020 04:39होमपेज › Goa › पणजीतील 50 टक्के दुकाने आळीपाळीने खुली ठेवणार 

पणजीतील 50 टक्के दुकाने आळीपाळीने खुली ठेवणार 

Last Updated: Apr 26 2020 1:02AM

संग्रहित छायाचित्रपणजी : पुढारी वृत्तसेवा

केंद्रीय गृह मंत्रालयाने लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल केल्याने पणजीच्या बाजारपेठेतील 50 टक्के व्यापारी आपली दुकाने सोमवारपासून आळीपाळीने सुरू करणार असल्याची माहिती महापौर उदय मडकईकर यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली. महानगरपालिकेचे मुख्य मार्केट 3 मेपर्यंत बंदच ठेवले जाणार आहे. मात्र इतर बाजारपेठांत, इमारत प्रकल्पांत व निवासी वसाहतीत असलेली दुकाने, 18 जून मार्ग, आत्माराम बोरकर मार्गवरील तसेच महानगरपालिका क्षेत्रातील अन्य छोटी-मोठी दुकाने सुरू ठेवली जाणार असून त्यासाठी महानगरपालिकेकडून खास परवानगी घेणे सक्तीचे आहे. विनापरवानगी कोणालाही दुकाने सुरू करता येणार नाही, असे त्यांनी सांंगितले.

शहरातील 18 जून मार्ग व अन्य मार्गांवर दुतर्फा असलेल्या दुकानांपैकी 50 टक्केच दुकाने एका दिवशी सुरू ठेवता येणार आहेत. उर्वरित 50 टक्के दुकाने त्यादिवशी सुरू ठेवण्यासाठी परवानगी दिली जाणार नाही. एकाच मार्गावरील व एकाच बाजारपेठेतील एकाचबरोबर सगळी दुकाने सुरू करता येणार नाहीत. महानगरपालिकेने ऑनलाईन परवानगीसाठी अर्ज स्वीकारणे सुरू केले आहे. बाजारपेठेत दुकाने सुरू करण्यासाठी इच्छुक असलेल्या व्यापार्‍यांनी ऑनलाईन अर्ज सादर करावेत, असे आवाहन महापौरांनी केले आहे. 

व्यापार्‍यांनी तसेच खरेदीसाठी येणार्‍या ग्राहकांंनी मास्कचा वापर, सुरक्षित अंतर ठेवण्यासह अन्य नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. सर्व व्यापार्‍यांना दुकानाच्या बाहेर ग्राहकांना उभे राहण्यासाठी एक मीटरचे अंतर चिन्हांकित करावे लागणार आहे. दुकान मालकांकडून नियम व अटींचे उल्लंघन झाल्यास लॉकडाऊनच्या काळात त्यांना दिलेली परवानगी मागे घेऊन त्यांची दुकाने बंद केली जातील, असे मडकईकर यांनी सांगितले. 

पणजीच्या मार्केटातील भाजी व फळ विक्रेत्यांना रस्त्यावर बसून व्यापार करण्यासाठी बंदी करण्यात येणार आहे. त्या सर्वांना आयनॉक्सच्या परिसरात एकाच ठिकाणी व्यापार करण्यास परवानगी देण्याबाबत महानगरपालिका विचार करीत आहे, असे मडकईकर यांनी सांगितले.

 "