Wed, May 19, 2021 04:24
संवादकौशल्य कसे विकसित कराल?

Last Updated: Apr 19 2021 8:22PM

मानसी जोशी

संवादकौशल्य हा करिअरचा, व्यवसायाचा गाभा आहे. व्यवसायात यशस्वी होण्यासाठी आपण बोलण्यात उस्ताद असायला हवे. बोलण्यात स्पष्टता, वास्तवता आणि तथ्य असावे लागते.

संवादकौशल्य हा करिअरचा, व्यवसायाचा गाभा आहे. कोणतीही योग्य गोष्ट अयोग्यपणाने मांडल्यास वा सांगितल्यास त्यावर टीका होते; याउलट एखादी चुकीची, अयोग्य गोष्ट योग्य प्रकारे सांगितली गेल्यास त्यावर विचार केला जातो आणि नंतर प्रतिक्रिया दिली जाते. सांगण्याचा मुद्दा संवाद पद्धतीचे महत्त्व खूप मोठे आहे. आज भवताली असे अनेक उद्योजक असतात की, ते आपल्या व्यवसायात आघाडीवर असतात. मात्र, बोलण्यात कमी पडतात. बरेचदा त्यामुळे त्यांना व्यवसायात काही संधींवर पाणी सोडावे लागते. काही वेळा अपेक्षेइतकी प्रतिष्ठा मिळत नाही. व्यवसायात यशस्वी होण्यासाठी आपण बोलण्यात उस्ताद असणे आवश्यक आहे. हे उस्तादपण कसे मिळवता येईल?

हावभाव आवश्यक : जेव्हा आपण एखाद्याशी संवाद करत असू तेव्हा आपल्या चेहर्‍यावरचे हावभाव खूप महत्त्वाचे ठरतात. आपण जे काही म्हणणे मांडत असू, त्या गोष्टीचे प्रतिबिंब आपल्या चेहर्‍यावर पडायला हवे, तरच समोरील व्यक्‍ती आपल्या बोलण्यावर अधिक प्रभावित होईल आणि चटकन विश्‍वास ठेवेल. नर्विकारपणे बोलत राहिलो तर आपला प्रभाव पडणार नाही.  

बोलण्यातील समतोलपणा : संवादकौशल्य वाढवण्यासाठी काही पथ्य पाळण्याची गरज आहे. आपले बोलणे नेहमीच संतुलित आणि ठोस असावे. भरकटणारे, पाल्हाळ, असंबंध बोलणे टाळावे. मुख्य मुद्द्यापासून आपण भरकटणार नाहीत, याची खबरदारी घ्यायला हवी. शब्दांचा प्रयोग अत्यंत जबाबदारीने करावा. थोडक्यात आणि मोजक्याच शब्दात आपले म्हणणे मांडावे. यामुळे 
समोरील व्यक्‍तीवर चांगला प्रभाव पडू शकतो आणि आपण त्याचे मन जिंकू शकतो. 

दमदार व्यक्‍तिमत्त्व : कोणत्याही क्लाइंटला प्रभावित करण्यासाठी आपले व्यक्‍तिमत्त्व अधिक उठावदार असणे गरजेचे आहे. एवढेच नाही तर बोलण्याची शैैलीदेखील तितकीच मधूर, लाघवी असावी. जेव्हा आपले म्हणणे स्पष्टपणे आणि आत्मविश्‍वासपूर्वक मांडू तेव्हा समोरील व्यक्‍ती आपल्यावर लवकर विश्‍वास ठेवेल. गोलगोल बोलत राहिल्यास कालांतराने ती व्यक्‍ती आपल्या बोलण्याकडे लक्ष देणार नाही. जर आपण आततायीपणे, आक्रस्तळेपणाने बोललो तर त्याचा नकारात्मक परिणाम होऊ शकतो. 

काळजीपूर्वक ऐका : उकृष्ट संवादक होण्यासाठी अगोदर आपण चांगले श्रोता होण्याची गरज आहे. जोपर्यंत समोरील व्यक्‍तीचे संपूर्णपणे म्हणणे ऐकून घेत नाहीत, तोपर्यंत आपण भूमिका मांडू शकणार नाहीत. परस्परांच्या विचारांचे आदानप्रदान झाल्याशिवाय बोलणी यशस्वी होणार नाहीत. जर योग्यरीतीने आपण म्हणणे ऐकून घेतले तर आपणही अचूक पद्धतीने म्हणणे मांडू शकू. संवाद एकतर्फी असेल तर तो अर्धवट राहू शकेल. समोरील व्यक्‍तीला त्याचे म्हणणे मांडण्याचे संपूर्ण स्वातंत्र्य असावे. तो बोलत असताना मध्येच आपण बोलू नये. 

आत्मविश्‍वास असावा : एक गोष्ट नेहमीच लक्षात ठेवावी, ती म्हणजे प्रभाव पाडण्यासाठी स्वत:मध्ये आत्मविश्‍वास असणे आवश्यक आहे. जेव्हा आपल्या बोलण्यात आत्मविश्‍वास असेल तेव्हा तो आत्मविश्‍वास चेहर्‍यावरही दिसेल. कोणतीही गोष्ट किंवा मत मांडताना ती आत्मविश्‍वासपूर्वक मांडायला हवी. बोलण्यात फाजील किंवा अतिआत्मविश्‍वास नसावा. बोलण्यात स्पष्टता, वास्तवता आणि तथ्य असावे.