Tue, Aug 04, 2020 10:42होमपेज › Edudisha › बना फॅशन कोरिओग्राफर 

बना फॅशन कोरिओग्राफर 

Last Updated: Oct 08 2019 1:31AM
बदलत्या जीवनशैलीत फॅशनला अनन्यसाधारण महत्त्व आले आहे. विशेषत: कार्पोरेट कंपन्यांमध्ये आपण केवळ काम करणे एवढेच पुरेसे नाही तर, समोरील व्यक्तीवर, कंपनीवर छाप पाडण्यासाठी आपण केलेला पेहराव, राहणीमान, चालण्याची पद्धतही कार्पोरेट कल्चरला साजेशी असावी, अशी कंपनीची सर्वसाधारण अपेक्षा असते. कंपनीत काम करणारे युवक किंवा युवती जेव्हा फॅशनबल राहतात किंवा कार्पोरेट लूक ठेवतात, तेव्हा ही फॅशन किंवा स्टाईल येते कोठून असा प्रश्न सर्वसामान्यांना पडल्याशिवाय राहत नाही. जाहिराती, फॅशन शो किंवा पोस्टर पाहून आपण ती फॅशन रूढ करतो. तत्पूर्वी ती फॅशन बाजारात आणण्यासाठी फॅशन कोरिओग्राफर नावाचा व्यक्ती काम करत असतो. मॉडेलच्या अंगावरचे कपडे, आभूषण ग्राहकांना, कंपन्यांना कसे आवडेल यासाठी तो दक्ष असतो. फॅशन कोरिओग्राफरला आपण ‘कॅटवॉक’ कोरिओग्राफीही म्हणतो. आपल्याला ग्लॅमर आणि फॅशनच्या आवडीसोबतच कल्पकता असेल तर या क्षेत्रात करिअर करण्याची उत्तम संधी आहे. 

कामाची पद्धत : फॅशन किंवा कॅटवॉट कोरिओग्राफर हा प्रोफेशनल मॉडेलला कपड्याचे सादरीकरण करण्याचे प्रशिक्षण देत असतो. प्रत्येक मॉडेलला तिच्या व्यक्तिमत्त्वानुसार कपड्याचे नमुने दिले जातात. ते कपड्यांचे नमुने फॅशन कोरिओग्राफरने ठरवलेल्या संगीताच्या तालावर, वैशिष्ट्यपूर्ण चालीवर विशिष्ट शैलीत सादर करावे लागतात. बड्या उद्योगपती, व्यावसायिकांसमोर आपली कलेचे सादरीकरण करताना मॉडेलचे आणि कोरिओग्राफरचे कौशल्य पणाला लागते. मॉडेलकडून सादर केला जाणारा पेहराव समोर असणार्‍या प्रत्येक व्यक्तीच्या नजरेत कसा भरेल याची काळजी कोरिओग्राफर करत असतो. फॅशन कोरिओग्राफर एका अर्थाने त्या शोचा दिग्दर्शकच असतो. तो किंवा ती कोरिओग्राफर मॉडेलचे व्यक्तिमत्त्व प्रसन्न कसे राहील, याचे टिप्स देतो. 

फॅशन विक किंवा अन्य कार्यक्रमात एखाद्या मॉडेलचे चालणे किंवा पाहणे केवळ अपील करणारे असून चालत नाही तर ती किंवा तो मॉडेल आकर्षकही दिसला पाहिजे, याकडे फॅशन कोरिओग्राफरला लक्ष द्यावे लागते. एखाद्या बहुचर्चित चित्रपटाच्या प्रदर्शनप्रसंगी, नवीन आणि वैशिष्ट्यपूर्ण कपड्यांचे सादरीकरण करायचे असेल तर अशा प्रकारच्या फॅशन शोचे आयोजन केले जाते. फॅशन कोरिओग्राफर हा कपड्यांच्या, दागिण्याच्या नवनवीन पद्धती आपल्या कल्पनेनुसार कंपन्यांसमोर आणत असतो. फॅशन कोरिओग्राफरच्या मदतीला फॅशन डिझायनर असतो. डिझायनरने तयार केलेला नमुना चांगल्या पद्धतीने लोकांसमोर कसा आणता येईल, याची रचना कोरिओग्राफर करत असतो. विशेषत:  पोषाखाची जाहिरात किंवा कॅटवॉक. 

परिश्रमाचे मोल : फॅशन कोरिओग्राफरला मिळणारे उत्पन्न त्याच्या कल्पनेवर, त्याच्या यशस्वीतेवर अवलंबून असते. प्रत्येक फॅशन शो आणि त्यात सादर होणारी शैली ही अन्य फॅशन शोपेक्षा सर्वोत्तम आहे, हे दाखवून देण्यासाठी तो प्रयत्नशील असतो.