Sat, Aug 08, 2020 14:04होमपेज › Crime Diary › काटा

काटा

Published On: Jul 10 2019 1:34AM | Last Updated: Jul 17 2019 2:10AM
 डी. एच. पाटील, म्हाकवे

दोन-तीन वर्षे पाऊस नसल्यामुळे धोंडबानं आपलं शेत पेरलं नव्हतं.  यंदा पावसाचं प्रमाण चांगलं राहील असा अंदाज पंचांग शास्त्रात व्यक्‍त केला होता. त्यामुळे निदान पोटापुरतं चार दाणं येतील या कल्पनेनं त्यानं शेत पेरण्याचा विचार केला. तसं डोंगराकडील भागात फारसं कोणी फिरकतच नव्हतं. या भागात पाऊस नसल्याने शेती कोणी दोन वर्षे पेरलीच नव्हती. ‘या वर्षी काय, आला पाऊस तर पेरायचं निदान रानाची स्वच्छता तर बघून येऊया’ म्हणून धोंडबा उठला. 

हातात वाकड्या मुठीचा विळा घेऊन तो डोंगराचा रस्ता चालू  लागला. वाटेत पाण्याअभावी निष्पर्ण झालेली झुडपे बघून तो हैराण झाला होता. पाऊस नाही तर झाडे लावायची कुठली ? प्रश्‍न त्याला पडला होता. प्रश्‍नांच्या गर्तेत तो डोंगराजवळ पोहोचला. सकाळचे नऊ वाजले होते. तो डोंगरमाथ्यावर आला. वाळलेली बाभळीची खुरटी झुडपे तो तोडू लागला. उन्हाचा तडाखा वाढतच होता. शर्टाच्या बाहीनं तो घाम पुसत काम करत होता. काम करता करता त्याला बाभळीचा काटा  पायात शिरला तसा, ‘आई ऽऽ ग’ म्हणून तो  मटकन खाली बसला. पळसाच्या झुडपाच्या सावलीत तो बसला. काटा काढला. तसं पायातून भळाभळा रक्‍त येत होतं. त्यावर त्यानं  जरासं पाणी टाकलं.  तसं पळसाचा झुडपात त्याला काही तरी दिसलं पायातली कळ विसरून तो पुढे गेला. अन् त्याला धक्‍का बसला. कुणा माणसाच्या शरीराचा सांगाडा पडला  होता. तो घाबरला. पायात चपला अडकून तो गावाकडं सुटला. गावात येऊन  त्यानं सरपंचांना माहिती सांगितली. तसं सरपंचांनी पोलिसांना फोन केला. पोलिस अर्ध्या तासातच घटनास्थळी पोहोचले. डोंगराच्या कडेला मानवी सांगाडा पळसाच्या झुडपात पडलेला होता. पोलिसांनी पंचनामा करून सांगाडा ताब्यात घेतला. सांगाड्याची चाचणी करून तो पुरूषाचा आहे की, महिलेचा हे सिद्ध होणार होतं.

पोलिसांनी गावात येऊन गावातील कोण बेपत्ता आहे का ? याबाबत चौकशी केली, मात्र याबाबत काहीच माहिती त्यांना उपलब्ध झाली नाही. सांगाड्याजवळ कपडेही नव्हते याचा अर्थ बर्‍याच दिवसांपासून सांगाडा इथे पडलेला असावा असा अंदाज पोलिसांनी  बांधला. त्यामुळे बर्‍याच काळापासून जवळपासच्या गावातील कोण महिला अथवा पुरूष बेपत्ता आहे याची चौकशी केली. मात्र जवळपासच्या चार-पाच गावातील कोणीही बेपत्ता नव्हते. 

तपासणीचा अहवाल आला. मृत व्यक्‍ती पुरूष असून अंदाजे वय 40 वर्षांपर्यंत असावे. मयत पुरूषाचा खून गळा दाबून पोटात वार करून अडीच वर्षापूर्वी झाला असल्याचा अहवाल डॉक्टरांकडून प्राप्‍त झाला. त्यामुळे अडीच वर्षापूर्वी कोण पुरूष कोणत्या गावातून बेपत्ता आहे याची चौकशी पोलिसांनी सुरू केली. मात्र जवळपास 20 गावे पालथी घालूनही पोलिसांच्या हाती काहीच लागले नाही. जवळच्या दोन्ही पोलिस स्टेशनला कोणी बेपत्ता आहे का? याची फिर्याद पोलिस तपासून पाहत होते. डॉक्टरांनी  दिलेल्या अहवालानुसार अडीच वर्षात बेपत्ता असल्याची यादी तपासून बघितली. एका इसमाचा अहवाल जुळत होता, परंतु दोन महिन्याचा फरक दिसत होता. पोलिसांनी लालसगाव मधील बेपत्ता असणार्‍या अरूण  सानेच्या पत्नीला चौकशीला बोलावले. मात्र ती आता गाव सोडून शहरात राहत होती. पोलिस पत्ता शोधत शहरात पोहोचले. पोलिसांना पाहताच पार्वती दचकली. पोलिसांनी चौकशी सुरू केली. जवळच एक पाच सहा वर्षाचा मुलगा खेळत होता. हावलदार ठोंबरेनी एक कटाक्ष  त्या मुलाकडे टाकला. तसा मुलगा बाहेर खेळण्यास गेला.

‘साहेब, अरूण लई चांगला माणूस होता; परंतु तो दारूचा नादात अचानक कुठे गायब झाला  तो मिळूनच आला नाही. सहा महिने शोध घेतला. गायब झाल्यावर दोन महिन्यांनंतर मी पोलिसात तक्रारही दिली होती. मात्र पोलिसांकडूनही काहीच पत्ता लागला नाही. मग मुलांच्या संगोपनासाठी अवधूतशी लग्‍न करून शहरात आले.’ पार्वतीचं ऐकूनं पोलिस घरा बाहेर आले.  तिनं दुसरे लग्‍न केलं  होतं. अरूणच्या घरी दुसरे कोणीच नव्हते. अरूणचा खून चाकूचे वार करून करण्यात आला होता. याचा अर्थ काहीतरी वेगळे कारण असल्याशिवाय खूनं होणं शक्यच नव्हतं. पोलिसांनी गावातच ठाण मांडलं. मात्र पंधरा दिवस होऊनही काहीच माहिती हाती लागत नव्हती. शिवाय अडीच वषार्ंचा काळ गेल्यामुळे लोक संबंधित घटना विसरून गेले  होते. 

पोलिसांनी धीर सोडला नव्हता. धोंडबाच्या गावापासून अरूणचे गाव 25 किमीवर होतं. शिवाय दोन-अडीच वर्षे पाऊसच नसल्याने  शेतकर्‍यांनी पेरण्याच केल्या नव्हत्या. अन् बोडक्या डोंगरावर जाणार तरी कोण? सगळेच गावकरी ‘अरूण दारूच्या लहरीत निघून गेलाय’ यावर ठाम होते. शिवाय ‘दोन अडीच वर्षानंतर सापडलेला सांगाडा अरूणचा कशावरून’ असे अनेक प्रश्‍न उभे होते.पोलिसांनी  खबर्‍यांना कामाला लावले. खबरेही हरतर्‍हेने माहिती गोळा करत होते. अरूणच्या घरी अवधूतचं येणं-जाणं होतं. एवढी माहिती पोलिसांना मिळाली होतीच. पोलिसांनी पुन्हा एकदा पावर्र्तीवर लक्ष केंद्रीत केलं. पुन्हा तिच्याकडे कसून चौकशी सुरू केली. मात्र ‘तो निघून गेलाय’ यावर ती ठाम होती. पोलिसांनी तिला दरडावले. मात्र ती ठामच होती. मग पोलिसांनी तिच्या मुलग्याला पोलिस स्टेशनला आणले. ‘हे बघ पार्वती, अरूण आम्हाला सापडलाय शिवाय तू दुसरं लग्‍न केले आहेस. त्याचा मुलगा त्याला हवाय, तो आम्ही त्याला आता परत देतो. याबरोबर ती उसळली ‘साहेब मुलगा माझा आहे, अन् मेलेला अरूण येईलच कसा?’ अन् नकळत बोलून ती फसली. भावनिकदृष्ट्या तिला बोलते केल्यानंतर ती रडू लागली. ‘होय साहेब, आम्हीच मारलं त्याला.’ 

‘अवधूत आमच्या घरी नेहमी यायचा. अरूण नेहमी दारूत लोळायचा. माझं व अवधूतचं प्रेम जमलं. आमच्या प्रेमात अरूणची अडचण होऊ लागली. त्यामुळे एकेदिवशी त्याला भरपूर दारू पाजली. चाकूने त्याच्यावर वार केला, अन्  ओसाड-बोडक्या डोंगराकडेला दिलं टाकून दोन अडीच महिने गेले. मग मी पोलिसांत तक्रार दिली. सहा महिन्यांनंतर  आम्ही लग्‍न करून शहरात आलो. अन् अडीच वर्षानंतर तुम्ही अचानक आलात.’

‘हो, डोंगराकडं कोणी फिरकलं नव्हतं त्यामुळे अरूणचा मृतदेह सडून सांगाडा राहिला होता. तुमचा खून पचलाही असता; मात्र  धोंडबाला लागलेला बाभळीचा काटाच आम्हांला इथंपर्यंत घेऊन आला. तुम्ही नवर्‍याचा काटा काढलाच, परंतु नियतीनं तुमचा काटा काढला.’ दोघेही तुरूंगात सडत आहेत.