Thu, Oct 01, 2020 17:47होमपेज › Belgaon › खुनी हल्ल्यात तरुण जखमी

खुनी हल्ल्यात तरुण जखमी

Published On: May 08 2019 1:56AM | Last Updated: May 08 2019 12:40AM
बेळगाव : प्रतिनिधी 

खडेबाजारमध्ये क्षुल्लक कारणातून एकाने तरुणावर खुनी हल्ला केल्याची घटना मंगळवारी दुपारी खडेबाजारमधील कोतवाल गल्लीच्या कॉर्नरला घडली. अहंमदखान हुसेनखान जमादार (वय 35, रा. तिरंगा कॉलनी, उज्ज्वलनगर) असे जखमीचे नाव आहे. 

हल्ल्यानंतर संशयित सद्दाम मुजावर (26, रा. दांडेली) हा फरारी झाला. सद्दामने कटरने गळ्यावर वार केल्याने अहंमदखानच्या गळ्यावर 12 टाके पडले आहेत. याबाबत मार्केट पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, अहंमदखान याचे खडेबाजारमधील कोतवाल गल्लीच्या कॉर्नरवर मोबाईल दुकान आहे, तर याच्याच बाजूला सद्दाम याच्या मामाच्या मालकीचे फळे विक्रीचे दुकान आहे. अहंमदखान हा आपल्या मित्रांशी गप्पा मारत दुकानाबाहेर थांबला होता. गप्पा मारता मारता अहंमदखानसह त्याचे सर्व मित्र सद्दामकडे पाहून हसत होते. तुम्ही माझी चेष्टा करताय व मला शिवीगाळ करताय, असे विचारत सद्दाम त्यांच्याजवळ गेला. तेव्हा अहंमदखानने आम्ही दुसर्‍या विषयावर चर्चा करतोय, तुझा काही संबंध नाही. असे सांगितले तरी चिडलेल्या सद्दामने फळे कापण्याचे कटर घेऊन अहंमदखानच्या कानाजवळ ओढले. यामध्ये अहंमदखानच्या कानाच्या बाजूचा भाग फाटला असून, त्याला तातडीने जिल्हा रूग्णालयात दाखल केले. 12 टाके पडल्याने पोलिसांनी या प्रकरणी 307 कलमांतर्गत खुनी हल्ल्याचा गुन्हा दाखल करून घेतला.पोलिस निरीक्षक विजय मुरगुंडी अधिक तपास करीत आहेत.