Tue, Sep 29, 2020 18:21होमपेज › Belgaon › ‘चिकोडी बंद’ला संमिश्र प्रतिसाद

‘चिकोडी बंद’ला संमिश्र प्रतिसाद

Published On: Dec 19 2017 1:56AM | Last Updated: Dec 19 2017 1:13AM

बुकमार्क करा

चिकोडी : प्रतिनिधी

माजी मंत्री तथा हुक्केरीचे आ. उमेश कत्ती यांनी दलितांबदल केलेल्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी विविध दलित संघटनांकडून पुकारण्यात आलेल्या चिकोडी बंदला समिश्र प्रतिसाद मिळाला.

भीमनगरातून अंकली खूटमार्गे बसव सर्कलपर्यंत उमेश कतींच्या प्रतिकृतीची  अंत्ययात्रा काढण्यात आली. यावेळी दलित बांधवांनी आ. कत्तींच्या निषेधार्थ घोषणाबाजी केली. त्यानंतर बसव सर्कलमध्ये मानवी साखळी व ठिय्या मांडून सुमारे दोन तास रास्तारोको केला. यावेळी आ. कत्तींच्या प्रतिकृतीचे दहन करण्यात आले. त्यानंतर राज्यपालांच्या नावे नायब तहसीलदार प्रमिला देशपांडे व तहसीलदार चिदंबर कुलकर्णी यांना निवेदन सादर करण्यात आले.
दलितांबद्दल अपशब्द वापरुन दलित समाजाचा अपमान केलेल्या आ. उमेश कत्तींचे आमदारपद रद्द करावे. तसेच त्यांच्यावर गुन्हा दाखल करुन अटक करावी. लोकसभा, विधानसभा, जिल्हा पंचायतीसह इतर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये असलेल्या आरक्षणाप्रमाणे विधान परिषदेतदेखील एससी-एसटींना आरक्षण द्यावे, नोकरीतील बढतीत आरक्षण मिळावे, बेरोजगार तरुण तरुणींना शिक्षणानुसार मासिक वेतन द्यावे आदी मागण्या करण्यात आल्या.
प्रकाश आंबेडकर ब्रिगेडचे राज्याध्यक्ष महेंद्र मंकाळे यांनी डॉ. आंबेडकरांनी दिलेल्या हक्कांच्या रक्षणासाठी अशाप्रकारे संघटित आंदोलन आवश्यक असल्याचे सांगितले. विशाल मेत्री म्हणाले, दलित बांधवांनी विविध संघटना स्थापन करुन आपली ताकद कमी करुन घेत आहेत. त्यामुळे एकाच संघटनेखाली शांततेत आंदोलन करावे. येत्या 24 तासांत सरकारने आ. कत्तींना अटक करावी.

यावेळी अ‍ॅड. सुदर्शन तमन्नवर, बसवराज ढाके, अशोक भंडाकरकर, प्रकाश करडे, श्रीनाथ घट्टी, शंकरानंद दरबारे, शोभा तळवार, मंजू हालभावी, संजय कांबळे यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी व दलित बांधव उपस्थित होते.

वाहतूक विस्कळीत  
बसव सर्कलमध्ये दलित बांधवांनी दोन तासाहून अधिक काळ मानवी साखळी करून रास्तारोको केला. यामुळे पोलिसांनी या चौकातून जाणारी वाहतूक रोखली होती. वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. यावेळी वाहनधारक व जमावाला रोखताना पोलिसांची दमछाक उडाली.