Wed, Oct 28, 2020 10:45होमपेज › Belgaon › रुग्णांपेक्षा कोरोनामुक्‍त अधिक

रुग्णांपेक्षा कोरोनामुक्‍त अधिक

Last Updated: Aug 03 2020 11:27PM
बंगळूर : पुढारी वृत्तसेवा

गेल्या महिनाभरात पहिल्यांदाच कोरोना रुग्णांच्या तुलनेत कोरोनामुक्‍त झालेल्यांची संख्या अधिक असल्याचे सोमवारी पाहावयास मिळाले. सोमवारी राज्यभरात 4752 रुग्ण सापडले, तर 4776 जण कोरोनामुक्‍त झाले. त्यामुळे कोरोनामुक्‍त झालेल्यांची संख्या 62,500 झाली. तर एकूण रुग्णसंख्या 1,39,571 झाली. दिवसभरात 98 जणांचा मृत्यू झाल्याने आतापर्यंत एकूण 2594 कोरोनाबळी ठरले. संपूर्ण राज्यात आता 74,469 रुग्ण उपचाराधीन आहेत. गेल्या काही दिवसांत कोरोनामुक्‍त होणार्‍यांची संख्या वाढली आहे. हे प्रमाण 5.67 टक्क्यांनी वाढल्याची माहिती वैद्यकीय शिक्षणमंत्री डॉ. के. सुधाकर यांनी दिली.

बंगळूरमध्ये पत्रकारांशी बोलताना सुधाकर म्हणाले, रविवारी सायंकाळपर्यंत राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 42.81 टक्के होते. त्याचवेळी बंगळुरातील हे प्रमाण 35.14 टक्के होते. गेल्या काही दिवसांमध्ये कोरोना चाचण्यांचे प्रमाण वाढवण्यात आले आहे. त्यामुळे दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढत होती. 

मडिवाळ (जि. मंड्या) येथे खासगी रुग्णालयात दाखल केेलेल्या पित्याचा मृत्यू झाल्यानंतर तिच्या मुलीला बिल भरल्याशिवाय मृतदेह मिळणार नसल्याचे सांगण्यात आले. याबाबत माहिती मिळाल्यानंतर संबंधित रुग्णालयाने तत्काळ मृतदेह नातेवाईकांना द्यावा. पैशापेक्षा माणुसकीला महत्त्व द्यावे, अन्यथा कारवाई करण्याचा इशारा दिला.

बेळगावात चाचण्यांवर परिणाम

आयसीएमआर प्रयोगशाळेत 13 जण बाधित आल्यामुळे टाळे ठोकण्यात आले असून त्याचा परिणाम अहवाल चाचणीवर झाला आहे. दिवसभरात चाचण्या रखडल्या असून जिल्ह्यात सोमवारी 54 जणांना कोरोनाची लागण झाली. पण, मृतांचा आकडा घटताना दिसत नसून पुन्हा 13 जणांचा मृत्यू झाल्याचे आरोग्य खात्याकडून समजले आहे. सरकारने 60 जण पॉझिटिव्ह जाहीर केले असून 11 जणांचा मृत्यू झाल्याचे कळवले आहे. पण, बाधितांच्या आकडेवारीने 4 हजारांचा टप्पा ओलांडला आहे.

मृतांचा आकडा वाढताच

कोरोनामुळे दिवसेंदिवस मृतांचा आकडा वाढत चालला आहे. सोमवारीही 13 जणांचा मृत्यू झाल्याचे आरोग्य खात्यातील सूत्रांनी सांगितले आहे. त्यामध्ये बेळगावातील सहा, रामदुर्ग येथील दोन, अथणी येथील एक, गोकाक येथील दोन, अंकली आणि बेल्‍लद बागेवाडी येथील प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला आहे. पण, सरकारी आकडेवारीनुसार जिल्ह्यात 10 जणांचा मृत्यू झाल्याचे नोंद करण्यात आले आहे.

दहा जण कोरोनामुक्‍त

जिल्हा आरोग्य खात्याने सोमवारी 29 रुग्ण  कोरोनामुक्‍त झाल्याचे घोषित केले. त्यांचा अहवाल निगेटिव्ह आल्यामुळे त्यांना घरी सोडले. त्यामुळे जिल्ह्यात आतापर्यंत 1080 जण कोरोनामुक्‍त 
झाले आहेत. सध्या 9 जणांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे. अजून 868 जणांचा अहवाल येणे बाकी आहे.

आरोग्य खात्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, बेळगाव शहरात सोमवारी 25 जणांना कोरोनाची लागण झाली. त्यामध्ये बाजार गल्‍ली, वडगाव, चव्हाट गल्‍ली, बॅ. नाथ पै सर्कल, वंटमुरी कॉलनी, कोरे गल्‍ली शहापूर, पोलिस हेडक्‍वाटर्स, टिळकवाडी, उज्ज्वलनगर, वीरभद्रनगर, घी गल्‍ली, रामतीर्थनगर, महाद्वार रोड, शिवाजी नगर, कॅम्प, येळ्ळूर रोड केएलई रूग्णालय या ठिकाणी कोरोनाची लागण झाली आहे

तालुक्यात सहा जणांना बाधा झाली आहे. त्यामध्ये सांबरा हवाई दल प्रशिक्षण केंद्रातील चौघांना कोरोनाची लागण झाली असून गावातील एकालाही बाधा झाली आहे. याशिवाय हिंडलगा येथे एकाला कोरोना पॉझिटिव्ह आला आहे.

खानापूर तालुक्यात लोंढा येथील 8 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. बैलहोंगल येथील पाच जणांना बाधा झाली आहे. याशिवाय रायबाग, रामदूर्ग, गोकाक, अथणी, चिकोडी याठिकाणी कोरोनाचा संसर्ग झाला आहे.

आयसीएमआर प्रयोगशाळेतील 13 जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे आरोग्य खात्याने प्रयोगशाळेला टाळे ठोकले आहेत. दोन दिवस निर्जंतुकीकरण करण्यात येत असून मंगळवारी प्रयोगशाळा सुरू होणार आहे. सध्या प्रयोगशाळा बंद असल्यामुळे अहवाल चाचणी वेगाने होत नाही. रॅपीड किटव्दारे तपासणीही थंडावली आहे. त्यामुळे रूग्णांची संख्या कमी झाली आहे, अशी माहिती आरोग्य विभागातून मिळाली आहे.
 

 "