Thu, Oct 29, 2020 08:08होमपेज › Belgaon › काळ्या दिनाचा कन्नडिगांना पोटशूळ

काळ्या दिनाचा कन्नडिगांना पोटशूळ

Last Updated: Oct 18 2020 12:20AM
बेळगाव : पुढारी वृत्तसेवा

भाषावर प्रांतरचनेत मराठी बहुल सीमाभाग कर्नाटकात डांबल्याच्या निषेधार्थ दरवर्षी एक नोव्हेंबर रोजी निघणार्‍या काळ्या दिनाच्या सायकल फेरीवरून कन्नडिगांना पोटशूळ उठला आहे. काळा दिन पाळण्यास जिल्हाधिकार्‍यांनी परवानगी देऊ नये, अशी मागणी कन्नड संघटनांनी लावून धरल्यामुळे जिल्हाधिकार्‍यांनी कोरोना महामारीमुळे सायकल फेरी काढण्यास परवानगी देता येणार नाही, असे सांगितले. तर पोलीस आयुक्‍तांनी बेकायदा फेरी करणार्‍यांवर कारवाई करण्यात येईल, असे सांगितले.

1 नोव्हेंबर कर्नाटक राज्योत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात शनिवारी जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांच्या अध्यक्षतेखाली  बैठक झाली. बैठकीला विविध कन्नड संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. बैठकीत राज्योत्सव कार्यक्रमापेक्षा महाराष्ट्र एकीकरण समिती पाळत असलेल्या कळ्यादिनाबद्दल अधिक चर्चा करण्यात आली.

कन्नड संघटनांनी मराठी जनता आणि महाराष्ट्र एकीकरण समिती विरोधात गरळ ओकली. मराठी जनता काळादिन पाळून कर्नाटकाचा अपमान करत आली आहे. त्यामुळे राज्यद्रोही महाराष्ट्र एकीकरण समितीला काळादिन पाळण्यास परवानगी देऊ नये, त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली.

जिल्हाधिकारी हिरेमठ यांनी कोरोना महामारीमुळे कोणत्याही प्रकारची मिरवणूक काढता येणार नाही. राज्योत्सव कार्यक्रम साध्या प्रमाणात करण्यात येणार आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीला काळा दिन पाळण्याबाबत कोणतीही परवानगी देण्यात येणार नाही. सायकल फेरी काढता येणार नाही, असे बैठकीत सांगितले.

पत्रकारांशी बोलताना शहर पोलीस आयुक्‍त डॉ. के. त्यागराजन यांनीही काळ्यादिनी सायकल फेरी काढण्यास आम्ही परवानगी दिलेली नाही. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांनी परवानगीबाबत आम्हाला पत्र दिले आहे. पण, त्यांना सायकल फेरीची परवानगी देण्यात येणार नाही, असे सांगितले.

भाषावार प्रांतरचना करताना 1956 साली केंद्र सरकारने बेळगाव, कारवार, निपाणी बिदर, भालकी सह सीमावर्ती मराठी बहुल भाग अन्यायाने कर्नाटकात डांबण्यात आला. त्यामुळे केंद्र सरकारच्या या निर्णयाविरोधात सीमाभागातील मराठी जनता दरवर्षी 1 नोव्हेंबर रोजी काळा दिन पाळत आली आहे. पण, मराठी विरोधी संघटना आणि जिल्हा प्रशासनाने मराठी भाषिकांची ही चळवळ मोडीत काढण्याचा सातत्याने प्रयत्न केला आहे. त्यामुळेच यंदा काळ्या दिनाच्या सायकल फेरीवर बंदी घालण्याची मागणी कन्नड संघटनांनी केली आहे, जिल्हा प्रशासनाने परवानगी दिली नाही तर प्रतिकात्मक निषेध व्यक्‍त करण्यात येईल, असा इशारा मराठी जनतेने दिला आहे.


 

 "