Fri, Aug 14, 2020 13:25होमपेज › Belgaon › वादळाचा तडाखा

वादळाचा तडाखा

Published On: Apr 28 2019 1:05AM | Last Updated: Apr 28 2019 1:05AM
बेळगाव : प्रतिनिधी  

शहर परिसरात शनिवारी दुपारनंतर ढगाळ वातावरण होऊन वळवाने हजेरी लावली. दरम्यान, शहर उपनगरात सोसाट्याच्या वार्‍यामुळे अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडल्याने रस्ते बंद झाले होते. मंडोळी रोडवर झाड कोसळल्याने वीज वाहिन्या तुटल्याने काही वेळ मार्ग बंद होते. या वातावरणाने शहरवासीयांना काही प्रमाणात गारवा मिळाला.

शहरात गुरुवारी यंदाचे उच्चांकी 39 अंश सेल्सिअस इतके तापमान नोंद झाले. यानंतर सलग दुसर्‍या दिवशी तापमान स्थिर राहिले. उष्म्यात कमालीची वाढ झाली. दुपारी 3 वा. सोसाट्याचा वारा आणि त्यातच वळवाचा शिडकावा झाला. जोरदार वार्‍यामुळे मंडोळी रोड ते हंगरगा या मार्गावर कणबरकर कॉलनी येथे झाड कोसळून वीज वाहिन्या तुटल्या. रस्त्याच्या मधोमध पडल्याने वाहतूक विस्कळीत झाली. जाधव कंपाऊंड, उद्यमबाग येथे झाड कोसळल्याने वाहतूक ठप्प होती. भाग्यनगर येथे गुलमोहर कॉलनीत झाडाच्या फांद्या मोडल्याने वीज वाहिन्या तुटल्या.

तसेच भाग्यनगर चौथ्या क्रॉसवर एका कारवर झाड कोसळल्याने काचा फुटल्या. येळ्ळूर रोड केएलईसमोरील कँटिनचे पत्रे उडून गेले. मिलिटरी महादेव मंदिराजवळ नानावाडीकडे जाणार्‍या मार्गावर झाड कोसळले. 

क्लब रोडवर रेसकोर्स मैदानाजवळ, नाथ पै सर्कल, व्हीटीयू जांबोटी रोड येथे  झाड कोसळून वीज वाहिन्या, खांब जमिनीवर कोसळले. वडगाव येथे मंगाई मंदिरासमोर झाड पडून दुचाकीचे नुकसान झाले. पिरनवाडी येथे जनता प्लॉटमध्ये घरावरील पत्रे उडून गेल्याने मोठे नुकसान झाले आहे. वडगाव विष्णू गल्ली येथे पिंपळ वृक्ष कोसळला. मात्र, कोणतीही हानी झाली नाही. बसरीकट्टी  परिसरात मात्र वळीवाने जोरदार हजेरी लावली. कुद्रेमानी येथे साईनगरात वीज खांब कोसळला. ढेकोळी रोड साईनगर येथे झाड कोसळून  रस्ता बंद झाला होता.

20 ठिकाणी उन्मळली झाडे

शहर, उपनगरात शनिवारी दुपारी 3 च्या सुमारास वादळी वार्‍याच्या तडाख्याने 20 हून अधिक ठिकाणी वृक्ष व फांद्या मोडून पडल्याने नुकसान झाले. यामध्ये झाडाखाली पार्क केलेल्या अनेक चारचाकी, दुचाकींचे नुकसान झाले. तर अनेक ठिकाणी वीजतारा व खांब कोसळल्याने लाखो रूपयांचे नुकसान झाले.