Sat, Aug 15, 2020 13:02होमपेज › Belgaon › महिलेवर अत्याचार करून खून :  एक दोषी, आज शिक्षा

महिलेवर अत्याचार करून खून :  एक दोषी, आज शिक्षा

Published On: Jun 20 2019 1:54AM | Last Updated: Jun 19 2019 11:57PM
बेळगाव : प्रतिनिधी  

विवाहाचे आमीष दाखवून महिलेेवर  अत्याचार करून खून केल्याप्रकरणी आरोपीवर गुन्हा शाबित झाला आहे. आठव्या अप्पर जिल्हा आणि सत्र न्यायालयात खटला सुरू असून दि.20 जून रोजी शिक्षा सुनावण्यात येणार आहे. 

संकदाळ (जि.गदग, ता.नरगुंद) येथील हुसेनसाब  फकिरसाब नदाफ (वय 23) याच्याविरोधात आरोप शाबित झाला आहे. चिक्कनरगुंद येथील महिलेला विवाहाचे आमीष दाखवून जाळ्यात ओढले होते. नदाफने सदर महिलेला चिक्कनरगुंद येथून दि. 17 ऑगस्ट 2015 रोजी रात्री 9 वा. दुचाकीवरून बटकुर्कीजवळील शेतवडीत नेऊन अत्याचार केला होता. दरम्यान, महिलेने वचन दिल्याप्रमाणे आपल्याशी विवाह करण्याचा तगादा त्याच्याकडे लावला होता. मात्र आरोपी हुसेनसाबाने विवाह करण्यास नकार दिला. यामुळे संतप्त झालेल्या महिलेने आपल्या भावांना सांगू, अशी धमकी दिली होती. यामुळे संतप्त झालेल्या हुसेनसाबने दि.18 ऑगस्ट 2015 रोजी सायंकाळी 5 वा. सदर महिलेचा ओढणीने गळा आवळून खून केला होता. यानंतर पुरावे नष्ट करण्यासाठी त्या महिलेचा  मृतदेह शेतवडीत टाकून तिच्या अंगावरील दागिने काढून घेऊन पोबारा केला होता.  या प्रकरणी नातेवाईकांनी रामदुर्ग पोलिस स्थानकात तक्रार दाखल केली होती. 

रामदुर्ग पोलिसांनी तपास हाती घेतला होता.  तपास अधिकारी सोमलिंग किरेदळ्ळी यांनी न्यायालयात दोषारोप सादर केले होते. येथील आठव्या अप्पर जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश व्ही. बी. सूर्यवंशी यांनी साक्षी पुरावे तपासून दि.20 रोजी शिक्षेचा निकाल राखून ठेवत आरोपीला दोषी ठरविले आहे. सरकारतर्फे अ‍ॅड. किरण एस. पाटील यांनी बाजू मांडली.