Sat, Aug 08, 2020 14:51होमपेज › Belgaon › यंदा ४३०० हेक्टरवर होणार तंबाखू लागवड

यंदा ४३०० हेक्टरवर होणार तंबाखू लागवड

Published On: Jul 31 2018 1:29AM | Last Updated: Jul 30 2018 8:47PMनिपाणी : मधुकर पाटील

निपाणी परिसरात यंदा रोहिणी व आर्दा नक्षत्रातील पाऊस हंगाम वगळता इतर नक्षत्रात चांगल्याप्रकारे पाऊस झाल्याने शेतकरीवर्ग सुखावला आहे. खरीप व रब्बी हंगामाच्या मध्यावर घेण्यात येणार्‍या तंबाखू पिकासाठी हा पाऊस समाधानकारक आहे. यंदा शिवारात 4300 हेक्टरवर या पिकाचे उत्पादन घेतले जाणार  असून गतवर्षीच्या तुलनेत 500 हेक्टरनी तंबाखू लागवड क्षेत्रात घट झाली आहे.

खरीप व रब्बी हंगामात आजही शेतकरी पारंपरिक पिकाचे उत्पादन  घेतात. ऊस लागवड क्षेत्रात झपाट्याने वाढ झाली आहे. उसाला मिळणार्‍या वाढीव दरामुळे पारंपरिक समजल्या जाणार्‍या तंबाखू पीक उत्पादनात घट झाली आहे. अनेक शेतकर्‍यांनी आंतरपिकाचा खर्च निघण्यासाठी खरिपात अधिक सोयाबीनचे पीक घेतले आहे.

रयत केंद्राच्या दप्तरी नोंदीनुसार चालू खरिपात सबसिडीवरील सुमारे 150 टन विक्रमी सोयाबीन बियाणाचा पुरवठा झाला आहे. 60 किलो तूर, 140 किलो मूग, 420 किलो उडीद,3 क्विंटल मका आणि 10 टन ताग या बियाणाचा शेतकर्‍यांना पुरवठा झाला आहे. शेतकरीवर्गाने घेतलेला खरीपाचा हंगाम जोमाने शिवारात डोलू लागला आहे. खरीप व रब्बी हंगामाच्या मध्यावर घेतले जाणारे तंबाखूचे उत्पादन अकोळ परिसरात सर्वाधिक घेतले जाते. त्यानंतर डोंगराळ पट्ट्यात या पिकाचे उत्पादन घेण्यात येते.

दरवर्षी साधारण पावसाचा अंदाज घेत ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात तंबाखू लागवडीला सुरूवात होते. यंदा पाचव्या चरणातील म्हातार्‍या पावसाने थोडी विश्रांती घेतल्याने पुढील आठवड्यात तंबाखू लावणीला सुरूवात होणार आहे. तंबाखू उत्पादक शेतकरी शेत तयार करुन ताग काढणी कामात गुंतले आहेत. यंदा तंबाखू रोपाचा तुटवडा भासणार आहे. अनेक शेतकर्‍यांनी पुढे रब्बीत घेतल्या जाणार्‍या ऊस, कांदा, शाळू पिके जोमाने घेता येण्यासाठी खरीपात हरवळी खताची उपलब्धता होण्यासाठी सोयाबीनची पेरणी केली आहे.

तंबाखू पीक घेण्यासाटी शेतकरीवर्गाला हिरवळी खत म्हणून ताग बियांची उपलब्धता करून दिली आहे. सध्या पावसाने ओढ दिल्याने लवकरच या पिकाच्या लागवडी होणार आहेत. खास करून अधिक उत्पादन देणारे वाण म्हणून 119 व आनंद 2 या जाती चांगल्या दर्जाच्या व उत्पन्न मिळवून देणार्‍या आहेत.   - बी. एस. यादवाड, साहाय्यक कृषी अधिकारी