Tue, Sep 29, 2020 19:30होमपेज › Belgaon › भीमगड अभयारण्यात 12 वाघांचे वास्तव्य

भीमगड अभयारण्यात 12 वाघांचे वास्तव्य

Published On: Dec 19 2017 1:56AM | Last Updated: Dec 19 2017 1:03AM

बुकमार्क करा

खानापूर : राजू कुंभार

तालुक्याचे वैभव असणार्‍या भीमगड संरक्षित अभयारण्यात दुर्मीळ वन्यप्राणी, पक्षी, कीटक आणि वनस्पतींची संख्या झपाट्याने वाढत आहे.  आपला राष्ट्रीय प्राणी असणार्‍या वाघांची संख्या कमी होत चालली असल्याची माहिती पुढे येत असताना भीमगड अभयारण्यात मात्र वाघांची संख्या वाढत चालली असल्याचे समजते. सध्या अभयारण्यात 12 वाघ असून एका मादीने दोन बछड्यांना नुकताच जन्म दिला आहे. तसेच दुर्मीळ ब्लॅक पँथरही कॅमेरॅमध्ये कैद झाला आहे.

2015-16 च्या वन्यप्राणी राष्ट्रीय  गणनेमध्ये 7  वाघ असल्याचे  निष्पन्न झाले होते. त्याकाळी कॅमेरा ट्रॅप आणि पायांच्या ठशांनी ही गणना झाली होती. सध्या ही संख्या 12 वर पोहचली असून अजूनही वाढू शकते. 
मध्यंतरी टायगर रिझर्व्ह फॉरेस्टमधून वाघांची संख्या झपाट्याने कमी झाल्याने वन्यप्रेमींसह राजकीय वर्तुळातसुध्दा खळबळ उडाली. जगभारातील वाघांपैकी 50 टक्के वाघ भारतात असल्याने जगाचे  देशाकडे लक्ष वेधले गेले. यामुळे सध्या व्याघ्रगणनेकडे सर्वांचेच लक्ष लागून आहे.

वन्यप्राणी  गणनेत जनगणनेसारखी माहिती मिळविणे शक्य नसल्याने त्यासाठी विशिष्ठ पध्दतींचा वापर केला जातो. वाघांना केंद्रस्थानी ठेवूनच ही गणना होत असल्याने वन्यप्राणी गणनेला व्याघ्र गणाना म्हटले जाते.


अशी होते व्याघ्र गणना


1)पगमार्क सेन्सेस (पायांचे ठसे)
वाघाच्या पायांचे ठसे सापडल्यानंतर त्याचे ट्रेसपेपरच्या सहाय्याने ट्रेसिंग घेतले जाते. त्यानंतर प्लास्टर ऑफ पॅरिसच्या सहाय्याने प्लास्टर कास्ट घेऊन तज्ज्ञांकडून विश्‍लेषण घेऊन संख्या मोजली जाते. यावरुन लिंग, वजन , ओळख आणि वय ठरविले जाते. ठशातील बोट चौकोनी आणि गोल आकाराचे असल्यास नर व लांब आणि किंचित आयताकृती असल्यास मादी असते. 

2)वॉटर होल काऊंट
पाणवठ्यावर मचाण बांधून निरीक्षणाने मोजणी करण्यात येते.  सध्या पारापेढी गुहा, पानशीरा नाला, देगावजवळील म्हादई नदी याठिकाणी अशा मचाणी उभ्या केल्या आहेत.

3)कॅमेरा ट्रॅपिंग(फोटो)
बंगळूर येथील ट्रॅक्ट ही संस्था हा प्रयोग करते. रात्रीच्यावेळी लेसर बीम आणि इन्फ्रारेड कॅमेरा ही दोन उपकरणे जंगलात समोरासमोर लावली जातात. या दोहोतून  वाघ गेला की लेसर बीम कट होऊन कॅमेरा क्लिक होतो. भीमगड संरक्षित अभयारण्यासह  वनखात्याच्या इतर 70 रेंजमध्ये 50 असे लेसर कॅमेरे बसविण्यात आले आहेत. फोटो पाहून अ‍ॅनालेसीस करुन चेहर्‍याची ओळख ठेवली जाते. 

4)लाईन ट्रान्सेक्ट
यामध्ये विशिष्ठ विभाग पाहून  प्रत्यक्ष वाघाला पाहून अथवा त्याची  विष्ठा पाहून संख्या मोजली जाते.
सध्या वाघांची संख्या वाढत चालल्याने ताडोबा (चंद्रपूर), पेंच (नागपूर), काळी (कारवार), गुमामळ (मेळघाट) आदी टायगर रिझर्व्ह फॉरेस्टमधील तज्ज्ञ भीमगडाला भेटी देत आहेत.

‘हत्तीडोह’ प्रमाणे ‘वाघडोह’ असण्याची शक्यता
वाघ देहत्याग करतो? हो हे खरे खरे आहे.  आजवर वृध्द वाघ मृतावस्थेत पडलेला कोणालाही सापडला नाही. किंवा ती जागादेखील सापडली नाही.  वाघ हा अशा ठिकराणी देहत्याग करतो. त्याठिकाणी मानवाला जाणे शक्य नसते. हत्तीचे सुध्दा तसेच आहे. वृध्द हत्ती ज्या डोहामध्ये आपला प्राणत्याग करतो त्या डोहाला हत्ती डोह असे म्हणतात. आदिवासी अशा डोहाचा शोध घेऊन डोहामधून हस्तीदंत व हाडे मिळवत होते. त्याप्रमाणे वाघडोह ही असण्याची शक्यता नाकारता येत नाही. 

व्याघ्रगणतीत सर्वोच्च न्यायालयही 2005 मध्ये व्याघ्रगणतीत वाघांची संख्या झापाट्याने कमी होत असल्याचे स्पष्ट झाले होते. तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी यासंदर्भात तातडीची बैठक बोलावून टास्कफोर्सची स्थापना केली होती. तर खुद्द सर्वोच्च न्यायालयाने यात विशेष लक्ष घालून वाघांची संख्या का कमी होतेय, हे जाणून घेण्यासाठी सीबीआयकडे जबाबदारी सोपविली होती.