Fri, Aug 14, 2020 14:05होमपेज › Belgaon › राम राम करत भामट्यांनी लुटले २ लाखांचे दागिने

राम राम करत भामट्यांनी लुटले २ लाखांचे दागिने

Published On: Apr 28 2019 1:05AM | Last Updated: Apr 28 2019 1:05AM
बेळगाव : प्रतिनिधी

‘राम राम पाटील...’ असा सलाम ठोकून ‘कुठे गेला मुलगा? बेळगावला आला नाही का?’ अशी विचारपूस करून दोघा भामट्यांनी हिरेबागेवाडीच्या एकाला लुटले. हिरेबागेवाडी येथील व्यक्तीजवळ जाऊन भूलथापा मारून सुमारे 2 लाख रुपये किमतीचे 6 तोळे दागिने लांबविल्याची घटना दुपारी मध्यवर्ती बसस्थानकात घडली. याप्रकरणी मार्केट पोलिस ठाण्यात  तक्रार दाखल केली आहे.
 बसनगौडा हादीमनी हे बसची वाट पाहत  असताना दोघा भामट्यांनी त्यांना ‘नमस्कार पाटील’ म्हणून सलाम ठोकला आणि त्यांच्या मुलाबद्दल विचारपूस केली. 

इतक्या सलगीने विचारपूस करत असल्याने आपल्या मुलाचे मित्र असतील या विचाराने बसनगौडा यांनी त्या भामट्यांशी वार्तालाप केला. सोने खरेदीसाठी आलो होतो, असे बसनगौडा यांनी त्यांना सांगितले. इतक्यात त्या भामट्यांनी  नामी शक्कल लढवली व आपणही सोन्याचा व्यवसाय करणार्‍या व्यापार्‍याला बसस्थानकावर  सोडण्यासाठी आलो आहोत, असे सांगितले.  तुमच्याकडील असलेल्या सोन्याला चांगली किंमत मिळवून देऊ असे त्या भामट्यांनी बसनगौडांना सांगितले.  

या भुलथापांना भुलून जाऊन बसनगौडा यांनी आपल्याकडील सोने त्यांच्या हवाली केले. या संधीचा  लाभ घेऊन चोरटे पसार झाले. त्यांचा शोध घेतला तरी ते हाती न लागल्याने बसनगौडा यांना आपण फसलो गेल्याचे लक्षात आले. यानंतर त्यांनी मार्केट पोलिस स्थानकात तक्रार दाखल केली. पोलिसांनी याची तत्काळ दखल घेऊन भामट्यांचा शोध जारी केला आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येत आहेत. घटनास्थळी मार्केट पोलिसांनी भेट देऊन माहिती घेतली.