Sat, Aug 15, 2020 12:32होमपेज › Belgaon › सुवर्णसौधला अजूनही सचिवालयांची प्रतीक्षाच

सुवर्णसौधला अजूनही सचिवालयांची प्रतीक्षाच

Published On: Jul 09 2019 1:11AM | Last Updated: Jul 08 2019 8:53PM
बेळगाव : प्रतिनिधी 

राज्य मंत्रिमंडळाने येथील सुवर्णसौधमध्ये बंगळूर विधानसौधमधून 10 सचिवालयांचे स्थलांतर करण्याचा निर्णय सात महिन्यांपूर्वी घेतला होता. मात्र ही घोषणा हवेतच विरली आहे. राजकीय इच्छाशक्तीअभावी सुवर्णसौधला सचिवालयांची अजून प्रतीक्षाच आहे.

मागील अधिवेशनावेळी उत्तर कर्नाटकातील विविध 60 संघटनांनी सुवर्णसौधसमोर सचिवालयांच्या मागणीसाठी मोठी आंदोलने केली होती. काही आंदोलकांनी स्वतंत्र उत्तर कर्नाटक राज्याच्या प्रतिकात्मक ध्वजही फडकावला होता. मात्र, असे घडूनही राज्य सरकारने उत्तर कर्नाटकाकडे दुर्लक्षच केले आहे. 

आंदोलनांचा धसका घेऊन मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी सचिवालयांच्या स्थलांतरांचा अभ्यास करण्यासाठी 19 डिसेंबर 2018 रोजी मंत्रिमंडळ उपसमिती स्थापन केली होती. नंतर स्थलांतरासंबंधी राजपत्रात 14 जानेवारी 2019 रोजी घोषणाही केली होती. पण त्यानंतर यासंबंधी कोणतीच ठोस कारवाई झाली नाही.

राजपत्रातील घोषणेप्रमाणे या सचिवालयांचे स्थलांतर केल्यास उत्तर कर्नाटकच्या विकासासाठी ते लाभदायी ठरेल आणि प्रशासन लोकांच्या दारापर्यंत नेण्यास मदत होणार आहे. राजप्त्रात सचिवालयांचे स्थलांतर 11 एप्रिलपासून करण्याचे जाहीर केले होते. मात्र, उत्तर कर्नाटकातील राजकीय नेत्यांनी याचा पाठपुरावा केला नाही. त्याचबरोबर असेही सांगितले जाते की आयएएस लॉबी या सचिवालयांच्या स्थलांतरामध्ये आडकाठी आणण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु, राज्य सरकारने कोणत्याही दबावाचा मुलाहिजा न बाळगता लोकांच्या कल्याणासाठी सचिवालये सुवर्णसौधमध्ये स्थलांतर करणे आवश्यक आहे, असे आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे. स्थलांतर न होण्यामागे लोकप्रतिनीधींची उदासीनताच कारणीभूत असल्याचे सिद्ध होत आहे.

स्थलांतर करण्यात येणारी प्रस्तावित सचिवालये
1)कृष्णा भाग्य जल निगम मर्यादित आलमट्टी
2) कर्नाटक निरावरी निगम, दावणगिरी
3)कर्नाटक राज्य वस्त्रोद्योग विकास महामंडळ, बेळगाव
4)ऊस विकास आयुक्तालय आणि साखर संचालक कार्यालय, बेळगाव
5)उत्तर कर्नाटक पाणी पुरवठा आणि सांडपाणी प्रक्रिया मंडळ, हुबळी
6) पुरातत्व आणि वस्तुसंग्रहालय विभाग, हंपी
7) कर्नाटक राज्य मानवाधिकार कार्यालय, धारवाड
8) कर्नाटक राज्य माहिती आयुक्तालय, गुलबर्गा
9)कर्नाटक राज्य माहिती आयुक्तालय, बेळगाव
10)उप लोकायुक्त कार्यालय, धारवाड